• Sun. Sep 22nd, 2024

पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ‘आयुष्यमान भव’ मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

ByMH LIVE NEWS

Sep 13, 2023
पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ‘आयुष्यमान भव’ मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : केंद्र शासनाची महत्वकांक्षी ‘आयुष्यमान भव’ मोहीम जिल्ह्यात दि.17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 दरम्यान राबविण्यात येणार आहे, याचा जिल्हास्तरीय शुभारंभ सेवा रुग्णालयात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते संपन्न झाला. या मोहिमेअंतर्गत आयुष्यमान आपल्या दारी 3.0, आभा कार्ड नोंदणी व वितरण, स्वच्छता अभियान, आयुष्यमान मेळावा, रक्तदान मोहीम, अवयव दान जनजागृती मोहीम, 18 वर्षावरील पुरुष आरोग्य तपासणी मोहीम, आयुष्यमान सभा, अंगणवाडी व प्रा.शाळांमधील तपासणी इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यावेळी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, सिपीआर अधिष्ठाता डॉ.प्रकाश गुरव, उपसंचालक डॉ.प्रेमचंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजेश गायकवाड, अधिष्ठाता डॉ.अशोक गुरव व इतर मान्यवर उपस्थित होते.

या अगोदर आयुष्यमान भव या मोहिमेचा राष्ट्रीय स्तरावरील शुभारंभ मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ऑनलाईन संपन्न झाला. त्यानंतर राज्य स्तरावरील आयुष्यमान भव मोहिमेचा शुभारंभ मा.राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कार्यकमात प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील टीबी चॅम्पीयन, निक्षय मित्र यांचा सन्मान तसेच आभा कार्ड व गोल्डन कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी पालकमंत्री केसरकर म्हणाले, सर्वसामान्यांना व गोरगरीबांना चांगले आरोग्य मिळावे या हेतूने पंतप्रधान यांच्या वाढदिवसापासून ते महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत ही मोहीम संपुर्ण देशात राबविली जाणार आहे. कोल्हापूर जिल्हयाने आयुष्यमान कार्ड व आभा कार्डचे वाटप येत्या काळात 100 टक्के पुर्ण करून जिल्हयाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. या कालावधीत विविध उपक्रम यशस्वीपणे राबवून रक्तदान शिबीर, अवयव दान जनजागृती मोहीम यशस्वी करावी. यावेळी त्यांनी सेवा रूग्णालयाची स्वच्छतेबाबत प्रशंसा करून येथे 100 खाटांचे रूग्णालय येत्या काळात सुरू करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

खासदार धनंजय महाडिक यांनी या मोहिमेबाबत पंतप्रधान, मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांचे आभार मानून आयुष्यमान मोहिमेची प्रशंसा केली. त्यांनी आरोग्य कर्मचारी यांचे आभार मानून चांगली सेवा दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. ते म्हणाले, कोविड, क्षयरोग यासारख्या आजारांवर अखंड सेवा देत त्यांनी लोकांना सुखरूप घरी सोडले. त्यांचे निरोगी समाज निर्मितीसाठी चांगले योगदान आहे. आयुष्यमान भव ही मोहीम सर्वांनी घराघरात पोहचवावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यांचा केला सन्मान

टीबी चॅम्पियन सन्मान : व्ही डी चौगुले, वैजनाथ पवार, ओमकार पवार, हरी ईश्वरा माळी, बाबासो शंकर पाटील, सोमनाथ करंबळी.

निक्षय मित्र सत्कार : माजी आमदार अमर महाडिक, इंडियन रेड क्रॉस सोसायटी कोल्हापूर, होप फाउंडेशन गडहिंग्लज, अथणी शुगर लिमिटेड, लोटस फाउंडेशन कोल्हापूर.

आभा कार्ड वितरण : पांडुरंग आंबे, पद्मा ढीसाळ, खुशी वळकुंजे, गोपाल खोटरे.

गोल्डन कार्ड : निवास कांबळे, उत्तम नवले, यशवंत पाटील.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed