• Sun. Sep 22nd, 2024

‘आयुष्मान भव’ मोहिमेत महाराष्ट्र उत्कृष्ट काम करून दाखवेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

ByMH LIVE NEWS

Sep 13, 2023
‘आयुष्मान भव’ मोहिमेत महाराष्ट्र उत्कृष्ट काम करून दाखवेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई, दि. १३ : आपल्याकडे निरोगी आयुष्यासाठी ‘आयुष्मान भव’ असा आशीर्वाद दिला जातो. या भावनेतून देशवासियांच्या निरोगी आयुष्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आयुष्मान भव’ मोहिमेची सुरूवात राज्यभर करणार आहोत. या मोहिमेत महाराष्ट्र देशामध्ये उत्कृष्ट काम करून नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

आजपासून देशात ‘आयुष्मान भव’ मोहिमेस सुरुवात झाली असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशपातळीवर या मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी राज्याच्या मोहिमेचा शुभारंभ सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून नागरिकांना भक्कम आधार देण्यात आला. गेल्या वर्षभरात १०० कोटींपेक्षा जास्त मदत देण्यात आली आहे. सर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजनेअंतर्गत एकत्रितपणे २ कोटी कार्डांचे वाटप करण्यात येणार आहे. आता ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण मिळणार आहे. महाराष्ट्र आरोग्याच्या क्षेत्रात देशात अग्रेसर असून सर्वसामान्य नागरिकाला केंद्रबिंदू ठेवून आरोग्यविषयक योजना आणि उपक्रम राबविले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

आयुष्मान कार्डच्या माध्यमातून सामान्यांना वेळेवर वैद्यकीय उपचार घेणे शक्य होणार असून  यासाठी “आयुष्मान भव” ही महत्त्वाकांक्षी मोहीम १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत राबविली जाणार आहे. मोहिमेत पात्र लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड नोंदणी करून त्याचे वितरण करण्यात येणार आहे.

विविध उपक्रमांचा शुभारंभ

याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात उल्लेखनीय काम केलेल्या “निक्षय मित्र” व जिल्ह्यांना देखील गौरविण्यात आले. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री आरोग्य या एकत्रित योजनेच्या कार्ड वाटपास सुरुवात करण्यात आली. राज्यात या योजनेचे  २ कोटी कार्डांचे वाटप करण्यात येणार आहे.

आज या समारंभात आरोग्य आधार अॅप, महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अॅप, तसेच राज्यातील आरोग्यवर्धिनी केंद्रातील अधिकाऱ्यांसाठीचे “समुदाय आरोग्य अधिकारी अॅप” यांचा शुभारंभ करण्यात आला.

सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू 

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ही मोहीम राबवताना गावपातळीपर्यंत गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवा देणे गरजेचे आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी, रक्तदान मोहीम, अवयवदान जागृती मोहीम, स्वच्छता मोहीम, १८ वर्षांवरील पुरुषांची आरोग्य तपासणी अशा मोहिमा राबविण्यात येतील. राज्य शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयात रुग्णांना वैद्यकीय सेवा, तपासणी  नि:शुल्क करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत गेल्या वर्षभरात ११२ कोटीपेक्षा जास्त  मदत केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

२ ऑक्टोबरला आयुष्मान ग्रामसभा

२ ऑक्टोबर रोजी आयुष्यमान ग्रामसभा होणार असून ती आयुष्मान भारत आरोग्य योजनेच्या जाणीवजागृतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आयुष्मान ग्राम सभेमध्ये पात्र लाभार्थ्यांची यादी त्याचबरोबर यापूर्वी ज्या लाभार्थ्याने आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा लाभ घेतला आहे, अशा लाभार्थ्यांची यादी आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत संलग्नित असेलल्या रुग्णालयांची यादी अद्ययावत असावी, अशा सूचनाही देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

अवयवदानाला महत्त्व

अवयव दान हे सर्वात मोठे आणि पुण्याचे कार्य आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आयुष्मान सभेमध्ये याविषयीही जागृती करण्यात यावी. क्षयरुग्ण यांना पोषण आहार देण्यासाठी ‘निक्षय मित्र’ बनविणे हा उपक्रमही राज्यातील सामान्य नागरिकांच्या आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed