दर वर्षी सीएसआयआरच्या वर्धापनदिनी, २६ सप्टेंबरला भटनागर पुरस्कारांची घोषणा होत असते. गेल्या वर्षी मात्र, हे पुरस्कार जाहीर करण्यात आले नव्हते. सोमवारी ‘सीएसआयआर’च्या दिल्ली येथे आयोजित ‘एक आठवडा एक प्रयोगशाळा’ या उपक्रमाच्या कार्यक्रमात परिषदेच्या महासंचालक डॉ. एन. कलैसेल्वी यांनी २०२२ साठीच्या शांतिस्वरूप भटनागर पुरस्कारांची घोषणा केली. यंदाचे भटनागर पुरस्कारार्थी पुढील प्रमाणे – जैवशास्त्रे : डॉ. अश्वानी कुमार (सीएसआयआर- आयएमटी, चंडीगड), डॉ. मद्दिका सुब्बा रेड्डी (सीडीएफडी, हैदराबाद), रसायनशास्त्रे : डॉ. अक्कातू टी. बिजू (आयआयएस्सी, बेंगळुरू), डॉ. देवव्रत मैती (आयआयटी, मुंबई), पृथ्वी विज्ञान : डॉ. विमल मिश्रा (आयआयटी, गांधीनगर), अभियांत्रिकी शास्त्रे : डॉ. दीप्ती रंजन साहू (आयआयटी दिल्ली), डॉ. रजनीश कुमार (आयआयटी, चेन्नई), गणितीय शास्त्रे : डॉ. अपूर्व खरे (आयआयएस्सी, बेंगळुरू), डॉ. नीरज कायाल (मायक्रोसॉफ्ट रिसर्च लॅब, बेंगळुरू), डॉ दीप्यमान गांगुली (सीएसआयआर-आयआयसीबी, कोलकाता), भौतिक शास्त्रे : डॉ. अनिंद्य दास (आयआयएस्सी, बेंगळुरू), डॉ. वासुदेव दासगुप्ता (टीआयएफआर, मुंबई)
भवितव्य अंधारात
गेल्या वर्षी १६ सप्टेंबरला राष्ट्रीय पुरस्कारांच्या संख्येबाबत फेरविचार करण्याबाबत विविध केंद्रीय मंत्रालयांची एकत्रित बैठक पार पडली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार विविध मंत्रालयांच्या माध्यमातून शास्त्रज्ञांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची संख्या मर्यादित करून एकात्मिक पद्धतीने हे पुरस्कार देण्यात यावेत, अशी सूचना तज्ज्ञांनी केली होती. ‘सीएसआयआर’तर्फे दिल्या जाणाऱ्या भटनागर पुरस्कारांची प्रतिष्ठा पाहता ते कायम ठेवून राष्ट्रीय पातळीवर नोबेलच्या दर्जाचे विज्ञानरत्न पुरस्कार सुरू करावेत, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुचवले होते. मात्र, गेल्या वर्षी शास्त्रज्ञांची यादी तयार असूनही भटनागर पुरस्कार जाहीर न झाल्यामुळे हे पुरस्कार बंद तर करण्यात आले नाही ना, अशी शंका देशभरातील शास्त्रज्ञांनी व्यक्त केली. सन २०२३ साठीच्या भटनागर पुरस्कारांचे अर्जच मागवण्यात आले नसल्याने अद्यापही भटनागर पुरस्कारांचे भवितव्य अंधारात असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
डॉ. अपूर्व खरे यांचा गौरव
सन २०२२ साठीच्या गणित विषयातील भटनागर पुरस्कारासाठी बेंगळुरू येथील आयआयएस्सीमध्ये कार्यरत असलेल्या डॉ अपूर्व खरे या मराठी शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली आहे. मूळचे इंदूरचे असलेल्या डॉ. खरे यांचे आई-वडील निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झाले आहेत. डॉ. खरे यांचे शालेय शिक्षण भुवनेश्वर येथे झाले. कोलकाता येथे इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट येथे पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यावर पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेत रवाना झाले. शिकागो विद्यापीठातून त्यांनी गणितात ‘पीएचडी’ पूर्ण केली. त्यानंतर स्टॅनफर्ड विद्यापीठात गणित आणि सांख्यिकीमध्ये काही काळ अध्यापन केल्यावर ते बेंगळुरू येथील आयआयएस्सीमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. भटनागर पुरस्कार मिळाल्याची बातमी ऐकून आनंद झाला असल्याची भावना डॉ. खरे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना व्यक्त केली.