• Tue. Nov 26th, 2024

    मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास केंद्र शासनाकडून १६ कोटी रूपयांचा निधी प्राप्त – मंत्री अब्दुल सत्तार

    ByMH LIVE NEWS

    Sep 11, 2023
    मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास केंद्र शासनाकडून १६ कोटी रूपयांचा निधी प्राप्त – मंत्री अब्दुल सत्तार

    मुंबई, ‍‍दि. ११ : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत मुदत कर्ज योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या अर्जदारांना निधी उपलब्ध करुन दिला जातो. यासाठी १६ कोटी रूपयांचा निधी महामंडळास उपलब्ध झाला आहे. या निधीतून अल्पसंख्याक समाजातील अर्जदारांना व्यवसायासाठी अल्प व्याज दराने कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती, अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

    मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ हे राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास एवम वित्त निगम, नवी दिल्ली (एनएमडीएफसी) यांची राज्य वाहिनीकृत यंत्रणा म्हणून महाराष्ट्रात कार्यरत आहे. एनएमडीएफसी मार्फत कर्ज स्वरुपात प्राप्त होणाऱ्या निधीतून मुदत कर्ज योजना, सूक्ष्म पतपुरवठा योजना, डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना या योजनांची अंमलबजावणी महामंडळामार्फत राज्यात करण्यात येते. एनएमडीएफसी कडून कर्ज घेण्यासाठी महामंडळास ३० कोटी  रकमेची शासन हमी मंजूर करण्यात आलेली आहे, अशी माहिती मंत्री श्री.सत्तार यांनी दिली.

    एनएमडीएफसीमार्फत राबविण्यात येणाऱ्या मुदत कर्ज योजनेअंतर्गत महामंडळाकडे सुमारे २,४५४ इतके अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत १,१८६  लाभार्थ्यांना मंजुरीपत्र निर्गमित करण्यात आले असून ऑगस्ट २०२३ अखेर पर्यंत ६१६ लाभार्थ्यांना १७.७२ कोटी रुपये रक्कम वितरीत करण्यात आली आहे.

    एनएमडीएफसीच्या योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी मागणी केलेल्या सर्व अर्जदारांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी शासन हमीमध्ये ५०० कोटी रुपये इतक्या रकमेपर्यंत वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्री श्री.सत्तार यांच्या सूचनेनुसार महामंडळामार्फत अल्पसंख्याक विभागास सादर करण्यात आला आहे.

    *****

    शैलजा पाटील/विसंअ/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed