छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हा न्यायालयाच्या इमारतीमध्ये राष्ट्रीय लोक अदालत भरवण्यात आली होती. यात मोटार अपघातात जखमी असलेले गोरखनाथ पांडुरंग घुगे यांना मोठ्या अपघातामध्ये नुकसान भरपाईच्या प्रकरणात तडजोड करण्यासाठी सुनावणी ठेवण्यात आली होती. अपघातामध्ये जखमी झालेले गोरख घुगे यांनी एडवोकेट के एस तांदूळजे यांच्यामार्फत दहा लाख रुपये नुकसान भरपाईचा दावा केला होता. या सुनावणीसाठी न्यायालयाच्या इमारतीमध्ये येणे अपघातात जखमी झालेल्या घुगे यांना शक्य नसल्यामुळे ते कारमध्ये थांबले होते.
ही बाब जिल्हा न्यायाधीश एस आर उबाळे यांना कळली. नंतर ते स्वतः न्यायालयाच्या बाहेर पार्किंगमध्ये तडजोड करण्यासाठी आले. यावेळी दोघांचे म्हणण्यानंतर सात लाख रुपयांमध्ये तडजोड करण्यात आली. यावेळी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव वै.प्र. फडणवीस, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष सतीश मुंदवाडकर, सचिव एडवोकेट सदानंद सोनवणे, अर्जदार यांचे वकील एडवोकेट के एस तांदुळजे, विमा कंपनीचे वकील एडवोकेट के एस बनकर, एडवोकेट अनिरुद्ध उस्मानपुरकर, तसेच इन्शुरन्स कंपनीचे विधी अधिकारी रसिका सरदार आणि एडवोकेट मधुकर आहेर यांची यावेळी उपस्थिती होती.