विक्की चव्हाण हे गेल्या साडे चार वर्षांपासून भारतीय सैन्यदलात कार्यरत होते. श्रीनगर येथील पुंछ राजोरी येथे महार रेजिमेंट मध्ये कार्यरत होते. पहिल्यापासून कुस्तीची आवड असल्याने ते भारतीय सैन्य दलाकडून देखील कुस्ती खेळत असत. याच माध्यमातून चव्हाण यांची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत निवड झाली होती. पुढील महिनाभरात ही स्पर्धा होणार होती. त्यामुळे चव्हाण यांची जोरदार तयारी सुरु होती. नेहमीप्रमाणे काल सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास कुस्तीचा सराव सुरु असताना अपघात झाला. यात चव्हाण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
विक्की चव्हाण यांच्या निधनाची वार्ता चांदवड येथे त्यांच्या कुटुंबीयांना समजल्या नंतर चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या ह्या दुर्दैवी निधनाने हरनूल गावासह संपुर्ण चांदवड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. विक्की चव्हाण हे महिनाभरापूर्वीच सुट्टीनिमित्त गावाकडे येऊन गेल्याचे कुटुंबियांनी सांगितले. चव्हाण यांना कुस्तीची आवड असल्याने ते राष्ट्रीय स्तरावर पोहचले होते. याच स्पर्धेच्या निमित्ताने सराव सुरु असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.