मुंबई, दि. ८ : अल्पसंख्याक समाजातील समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी पाच तज्ज्ञ सदस्यांची अभ्यास समिती गठित करण्यात येणार आहे. समाजातील नागरिकांना घर बांधणीसाठी दहा लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत योजनेचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
अल्पसंख्याक विकास मंत्री श्री. सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली.
मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, अल्पसंख्याक बहुल क्षेत्रामध्ये चर्चासत्राचे आयोजन करून त्या माध्यमातून समस्या जाणून घ्याव्यात व त्यानुसार नवीन योजनाबाबतचे प्रस्ताव तयार करण्यात यावेत. या समाजातील नागरिकांसाठी नवीन विविध योजना तयार करुन त्या माध्यमातून समाजाचा विकास करण्याचा मानस आहे. मंत्री श्री. सत्तार यांनी या बैठकीत मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेवून समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी विविध मुद्दयांवर चर्चा केली.
या बैठकीस मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमियाँ शेख, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मो.बा. ताशिलदार तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
००००
शैलजा पाटील/विसंअ