सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील एका दूध संकलन केंद्रात कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणारा कॉस्टिक सोडा आणि मिल्की मिस्ट या रासायनिक पावडर यांच्या मिश्रणातून बनावट दूध बनवले जात होते. दुधाला आपण पूर्णान्न म्हणतो. मात्र, हे बनावट व भेसळयुक्त दूध आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. आता राज्यभरात सणासुदीचे दिवस सुरु होत आहेत. या दिवसांमध्ये अनेक मिठायांसाठी दूध वापरले जाते. या अशा भेसळयुक्त व बनावट दुधाचा वापर झाला, तर राज्यातील लाखो लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, अशी भीती सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली आहे.
अलीकडच्या काळात दुधभेसळीच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणाने वाढ होताना दिसत आहे. अन्न व औषध प्रशासनाने याकडे जातीने लक्ष दिले पाहिजे. राज्यभरातील दूध संकलन केंद्रांची तपासणी करण्याचे आदेश देऊन सर्वसामान्य जनतेला शुद्ध दूध उपलब्ध होईल, याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे.
गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा
गावागावांत दूध संकलन केंद्रांचे प्रमाण वाढले असून या दूध संकलन केंद्रांमधेच मोठ्या प्रमाणात दुधात भेसळ केली जाते. यापूर्वीच्या काळात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून दूध संकलन केंद्र व डेअरीची तपासणी केली जायची. त्यात काही गडबड असेल तर त्याकडे ‘चांगभलं’ करीत कारवाई दुर्लक्षित व्हायची. मात्र, प्रशासनाने याकडे बारकाईने लक्ष द्यावे. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, असेही तांबे यांनी सांगितले.