• Mon. Nov 25th, 2024

    जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला नियोजन समितीच्या निधीचे बळ

    ByMH LIVE NEWS

    Sep 6, 2023
    जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला नियोजन समितीच्या निधीचे बळ

    राज्य शासन राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध लोक कल्याणकारी योजना राबवत असते. या योजनांच्या माध्यमातून राज्याच्या शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात असतो. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा प्रशासनामार्फत लोक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी नियमितपणे सुरूच असते.

    परंतु अशा लोककल्याणकारी योजनांचा लाभ अधिक गतिमान पद्धतीने पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात “शासन आपल्या दारी” हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. सोलापूर जिल्ह्यात ही या उपक्रमाची प्रशासनामार्फत प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू असून जिल्हास्तरीय कार्यक्रम पंढरपूर येथे माहे सप्टेंबर 2023 मध्ये होण्याचे नियोजित आहे.

    या शासनाच्या कालावधीत मागील वर्षभरापासून जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजना व उपक्रमाची प्रशासनामार्फत अमलबजावणी सुरू आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला जिल्हा नियोजन समितीकडून मिळणाऱ्या निधीचे मोठे पाठबळ असते व त्या निधीच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध विकासात्मक कामे हाती घेऊन लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला जातो. त्या अनुषंगाने विभाग व उपक्रम निहाय माहिती पुढील प्रमाणे देण्यात येत आहे.

    जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात जिल्हा नियोजन समितीची भूमिका महत्त्वाची आहे. सन 2022-23 मध्ये जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण साठी 527 कोटी अनुसूचित जाती उपाययोजनासाठी 551 कोटी व आदिवासी क्षेत्राबाहेर उपयोजनासाठी 4 कोटी 28 लाख असे एकूण 682 कोटी 28 लाखाची तरतूद करण्यात आलेली होती, त्यापैकी 681.67 लाखाचा निधी नियोजन समितीने जिल्ह्यातील विविध विकास कामांवर खर्च करून जिल्ह्याच्या विकासाला चालना दिलेली आहे. तर जिल्हा वार्षिक योजना सर्व साधारण सन 2022 -23 मध्ये मार्च अखेरीस अर्थसंकल्पीय तरतुदी पैकी 99.96% निधी खर्च करून सोलापूर जिल्हा एकूण खर्चाच्या टक्केवारीत पुणे विभागात प्रथम क्रमांकावर राहिला आहे, ही बाब सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी नक्कीच आशादायी आहे. नियोजन समितीला मिळालेला निधी मंजूर असलेल्या योजनांसाठी खर्च करून जिल्ह्याचा जास्तीत जास्त विकास कशा पद्धतीने होईल यासाठी सर्व संबंधित विभाग व लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहेत.

    सन 2022 मध्ये दिवाळी सण, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राज्य शासनाने प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात हरभरा डाळ, तेल, साखर व रवा हे चार जिन्नस आनंदाचा शिधा म्हणून देण्याचा निर्णय घेतला. या अंतर्गत दिवाळी सणानिमित्त जिल्ह्यातील अंत्योदय अन्न सुरक्षा योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील एकूण 3 लाख 96 हजार तसेच गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अंत्योदय योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील 3 लाख 21 हजार शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येऊन त्यांच्या कुटुंबात सणासुदीच्या काळात आनंदी वातावरण निर्माण करण्याचा राज्य शासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात आला.

    सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे निर्माण झालेले आहे. केंद्रशासनाच्या भारतमाला परियोजना अंतर्गत सुरत-चेन्नई या प्रकल्पाची सोलापूर जिल्ह्यात 153.33 किलोमीटरची लांबी असून 1 हजार 180 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत 8, सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत 4 व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अंतर्गत 5 अशा एकूण 17 रस्त्यांच्या भूसंपादनाचे काम पूर्ण झालेले असून एकूण 3 हजार 817 कोटी रुपये इतकी भरपाई रक्कम 28 हजार 57  खातेदारांना वाटप करण्यात आलेली आहे. या महामार्गामुळे सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला अधिक गतीने चालला मिळेल याची खात्री आहे.

    पोलीस दल सक्षमीकरण अंतर्गत जिल्हा विकास यंत्रणेच्या माध्यमातून शहर पोलीस आयुक्त कार्यालयासाठी 9 चार चाकी व 4 दुचाकी तसेच ग्रामीण पोलीस दलासाठी 12 चार चाकी वाहनांचे लोकार्पण करण्यात आलेले आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 346 एकर परिसरामध्ये साडेतीन हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले असून, यावर्षी तीव्र उन्हाळ्यामध्ये या वृक्षांचे योग्य संगोपन करण्यात आले आहे. तसेच केंद्रात वाया जाणाऱ्या सांडपाण्यावरती सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाद्वारे दररोज दोन लाख लिटर पाणी वापरणे योग्य करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून 2 कोटी 23 लाखाचा निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे.

    हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेतून जिल्ह्यात 1 मे पासून 9 नागरी आरोग्य केंद्र कार्यान्वित केलेले आहेत. या केंद्रामार्फत सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जिल्ह्याच्या विविध ठिकाणी आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य शिबिरांचे आयोजन करून त्या त्या भागातील रुग्णांची तपासणी मोहीम राबवली जात आहे. कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत मागील दोन वर्षात विविध औद्योगिक, बँक, टेक्स्टाईल, फूड ॲग्रो अशा क्षेत्रातील उद्योजकामार्फत एकूण 5 हजार 940 बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक  विकास महामंडळामार्फत जिल्ह्यातील 7 हजार 543 उद्योजकांना 418 कोटी 28 लाख रुपये कर्ज वाटप झालेले असून, त्यांना या योजनेअंतर्गत 43 कोटी 47 लाख रुपये व्याज परतावा देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे बेरोजगारांना व नव उद्योजकांना राज्य शासनामार्फत प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2022-23 या वर्षात जिल्ह्यातील एकूण 685 लाभार्थ्यांना 2 कोटी 82 लाख रुपये इतका लाभ देण्यात आलेला आहे. पोस्ट मॅट्रिक्स, स्कॉलरशिप योजनेअंतर्गत सन 2022-23 या शैक्षणिक वर्षांमध्ये अनुसूचित जातीच्या एकूण 13 हजार 88 विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाला 44 कोटी 58 लाखांचे वितरण करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे रमाई आवास योजनेअंतर्गत सन 2023-24 या वर्षात नगरपालिका क्षेत्रातील 439 लाभार्थ्यांना व महानगरपालिका क्षेत्रातील 464 लाभार्थ्यांना एकूण 903 घरकुले मंजूर करण्यात आलेली आहेत.

    जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत केंद्र व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना असून  सन 2016-17 ते सन 2022-23 पर्यंत 70 हजार घरकुले देण्याचे उद्दिष्ट होते, त्यापैकी 49 हजार 848 घरकुले पूर्ण झालेले आहेत. तर 16 हजार 159 घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत. या पद्धतीने जिल्ह्यातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे.

    सोलापूर महापालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी अंतर्गत विविध पायाभूत विकासाची कामे सुरू आहेत.   देगांव, सोरेगांव जलशुद्धीकरण केंद्र व टाकळी हेड वर्क्स येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचे कामे झालेली आहेत. यासाठी मेडाकडे 10 कोटी 64 लाखाचा निधी वर्ग करण्यात आलेला होता. केंद्र शासन पुरस्कृत अमृत 20 अभियानांतर्गत सोलापूर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी 532 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला असून या अंतर्गत नवीन डिस्ट्रीब्यूशन व ट्रान्समिशन नेटवर्क, घरगुती नळ कनेक्शन आणि वॉटर ऑडिट ही कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. ही कामे पूर्ण झाल्यास सर्व नागरिकांना सुरळीतपणे नळाद्वारे पाणी उपलब्ध होणार आहे.

    जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात 43 अद्यावत रोवर मशीन च्या माध्यमातून भूमापनाची कामे करत आहे. अहमदनगर, सोलापूर, अक्कलकोट महाराष्ट्र कर्नाटक सीमा ग्रीन कॉरिडॉरचे 60 प्रकरणाचे अहवाल तसेच सोलापूर- तुळजापूर -उस्मानाबाद रेल्वे भूसंपादनाचे 9 गावाचे भूसंपादनाचे प्रस्ताव वेळेत व अचूकपणे भूमापन पूर्ण करून दिले आहेत.

    जल जीवन मिशन अंतर्गत 2024 अखेरपर्यंत हर घर नल से जल हे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. या अंतर्गत प्रतिदिन प्रतिमा 55 लिटर पाणी देण्याचे नियोजित असून सन 2023-24 वर्षाकरिता 834 कोटीचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातून एकूण पाच लाख 75 हजार 576 कुटुंबापैकी मार्च 2023 अखेर 2 लाख 1 हजार 244 कुटुंबाच्या नळ जोडण्याची नोंद संकेतस्थळावर घेण्यात आलेली आहे. उर्वरित कुटुंबांनाही सन 2024 अखेरपर्यंत नळ जोडणी देण्याचे नियोजन आहे.

    मागील वर्षभरापासून राज्य शासन  केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहे. लोक कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र व गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठीच  प्रत्येक जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी ‘ हा उपक्रम राबविला जात आहे. सोलापूर जिल्हा प्रशासन ही दिनांक 1 एप्रिल 2023 पासून शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत विविध शासकीय विभागाअंतर्गत असलेल्या योजनांचा लाभ  मिळवून देण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन पात्र लाभार्थ्यांचा शोध घेतला जात असून पात्र असलेल्या लाभार्थ्याकडून संबंधित योजनेचा अर्ज भरून घेऊन त्यांना लाभ मिळवून दिला जात आहे. या योजनेअंतर्गत एकही पात्र लाभार्थी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रशासनाने सूक्ष्मपणे नियोजन केलेले आहे.

     

    सुनील सोनटक्के

    जिल्हा माहिती अधिकारी, सोलापूर

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed