• Sat. Sep 21st, 2024

जेल आहे की हॉटेल, आरोपीला हॉटेलमधील जेवण, फिल्टरचे पाणी, नागपूरच्या पोलिस ठाण्यात चाललंय काय?

जेल आहे की हॉटेल, आरोपीला हॉटेलमधील जेवण, फिल्टरचे पाणी, नागपूरच्या पोलिस ठाण्यात चाललंय काय?

म.टा. प्रतिनिधी, नागपूर: स्नानगृहात डांबून सिगारेटचे चटके देऊन दहा वर्षीय मुलीचा अमानुष छळ केल्याप्रकरणात अटकेत असलेला आरोपी अरमान खान याची हुडकेश्वर पोलिस स्टेशनमध्ये पंचतारांकित बडदास्त होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या व्हीआयपी बडदास्तचे छायाचित्र व्हायरल झाल्याने समाजमाध्यमांवर रोष व्यक्त करण्यात येत आहे.

अरमान हा हुडकेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील अथर्वनगरी येथे राहतो. गेल्या चार वर्षांपासून अरमान, त्याची पत्नी हिना व मेहुणा अजहरने मुलीला घरी बंधक बनवून ठेवले. तिच्याकडून घरातील सर्व कामे करवून घेऊन तिघेही तिचा मानसिक व शारीरिक छळ करायचे. तिच्या सर्वांगाला सिगारेट, चाकूचे चटके द्यायचे. २९ ऑगस्टला अरमानच्या घराची वीज कापण्यात आली. यादरम्यान, मुलगी घरी एकटीच होती. कशीबशी ती खिडकीतील ग्रीलमधून बाहेर आली. चौकीदाराला ती दिसली. त्यानंतर चौकीदाराने परिसरातील रहिवाशांना माहिती दिली. रहिवाशाने हुडकेश्वर पोलिसांना कळविले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून ३१ ऑगस्टला अरमानला अटक केली. त्यानंतर त्याच्या मेहुण्यालाही अटक करण्यात आली.

हॉटेलमधील जेवण आणि फिल्टरचे पाणी!

पोलिस कोठडीदरम्यान अरमानची हुडकेश्वर पोलिसांनी पंचतारांकित बडदास्त ठेवली. त्याला हॉटेलमधील जेवण व फिल्टर पाणी दिले. नातेवाइकांशी संपर्क साधण्यासाठी त्याला मोबाइलही देण्यात आला. याशिवाय ठाण्यात रोज त्याला भेटायला त्याचे मित्रही येतात. याप्रकरणाचा तपास महिला अधिकाऱ्याकडे असणे आवश्यक असताना सध्या तपास मात्र पुरुष अधिकाऱ्याकडे आहे.

‘व्हायरल झालेल्या या छायाचित्राची तपासणी केली. अटक केल्यानंतर अरमानला रात्री ठाण्यात आणण्यात आले. रात्रीच्या वेळी आरोपींना जेवण देणारा ‘भत्तेवाला’ उपलब्ध नसतो. त्यामुळे हॉटेलमधून जेवण आणण्यात आले. या प्रकरणातील अन्य आरोपी अहजर याला अटक करण्यासाठी त्याचे लोकेशन शोधण्यासाठी अरमानला मोबाईलचा वापर करू देण्यात आला. या प्रकरणाच्यावेळी मी सुटीवर होतो’, असे हुडकेश्वर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed