चंद्रपूर जिल्ह्यात जनसंवाद यात्रेदरम्यान नाना पटोले बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मोदी सरकारविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी ही जनसंवाद यात्रा सुरु करण्यात आली आहे. महागाईने जनतेचे जगणे मुश्कील केले आहे, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, घर कसे चालवायचे ही चिंता लोकांना सतावत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव उतरलेले असतानाही मोदी सरकार मात्र पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी करत नाही. राज्यातील सरकारने वीज महाग केली आहे. शेतीला आठ तासही विज मिळत नाही, या परिस्थितीच्या विरोधात आपल्याला लढायचे आहे. जनसंवाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी चंद्रपूर जिल्हा सेवादलाने आयोजित केलेल्या संस्कृतीक कार्यक्रमानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ध्वजारोहण केले. ध्वजारोहणानंतर चंद्रपूर सेवादलाचे अध्यक्ष सुर्यकांत खणके यांनी जनसंवाद यात्रेसाठी ध्वज नाना पटोले यांच्याकडे हस्तांतरित केला. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी सकाळच्या सत्रात नगर जिल्ह्यातील जनसंवाद यात्रेत सहभाग घेतला व नंतर उत्तर महाराष्ट्रातील जनसंवाद यात्रेच्या तयारीची आढावा बैठक घेतली.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यवतमाळ जिल्ह्यातील वडकी, राळेगाव, आर्णी, महागाव येथे जनसंवाद यात्रेत सहभागी होत जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांच्याबरोबर माजी मंत्री वसंत पुरके, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापुरात विधान परिषदेतील गटनेते आ. सतेज बंटी पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली भुदरगड तालुक्यात पदयात्रा काढण्यात आली. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे पुणे शहरातील जनसंवाद पदयात्रेचा शुभारंभ पर्वती विधानसभा मतदारसंघातून करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.