• Mon. Nov 25th, 2024

    विद्यार्थी- पालकांचा इंग्रजी शिक्षणाकडे कल, ‘सीबीएसई’ बोर्डच्या शाळा सुरु करण्यात बीएमसी अव्वल

    विद्यार्थी- पालकांचा इंग्रजी शिक्षणाकडे कल, ‘सीबीएसई’ बोर्डच्या शाळा सुरु करण्यात बीएमसी अव्वल

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: अत्याधुनिक वर्गखोल्या, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, व्यायामशाळा, समुपदेशन, यांसह विविध अद्ययावत शिक्षण सुविधा असणाऱ्या ‘सीबीएसई’ बोर्डाच्या शाळा महापालिकेच्या प्रत्येक विभागात सुरू करण्यात येणार आहेत. सध्या पालिकेच्या अशा १४ शाळा सुरू असून, त्यांना विद्यार्थी-पालकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालिकेचे सहआयुक्त (शिक्षण) डी. गंगाधरन यांनी दिली.

    पालिकेच्या विविध भाषिक शाळांमध्ये तीन लाखांहून अधिक विद्यार्थी असून, दहावीपर्यंतच्या शाळा चालवल्या जातात. गेल्या काही वर्षांपासून पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे कल असल्याने इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत आहे. जागतिकीकरणात टिकून राहण्याकरिता व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक दुर्बल घटकांतील पालक आर्थिकदृष्ट्या परवडत नसतानाही ‘सीबीएसई, ‘आयसीएसई’ बोर्डाच्या शाळेत प्रवेश घेत आहेत. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने ‘सीबीएसई’च्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या प्रमाणात सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करणारी मुंबई पालिका देशातील पहिलीच महापालिका ठरली आहे. या शाळांमध्ये शिशुवर्ग ते सहावीपर्यंत एकेक तुकडी सुरू करण्यात येणार आहे.

    या शाळांमध्ये संगणकीय प्रयोगशाळा, ग्रंथालय, स्वतंत्र वाचनालय, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयांच्या स्वतंत्र व अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज प्रयोगशाळा असतील. तसेच सुसज्ज सभागृह, योगप्रशिक्षण, भाषा अभ्यासवर्ग, प्रसारमाध्यम अभ्यासवर्गाचाही समावेश असणार आहे. क्रीडाविषयक उपक्रम राबविण्यासाठी शाळांमध्ये भव्य पटांगण व स्वतंत्र वर्गखोल्या, शिशुवर्गांसाठी घसरगुंडी, झोके आदी सुविधा असतील. वर्गातील बाक व लिहिण्याचे टेबल रिसायकल केलेल्या वस्तूंपासून तयार केलेले असेल, असे नियोजन करण्यात आले आहे.

    शाळेच्या फी-वाढीचा मुद्दा, भाजप आमदाराला थेट शाळेच्या उपमुख्याध्यापिकांनीच दम भरला

    पालिकेने २०२०मध्ये पहिली ‘सीबीएसई’ शाळा जोगेश्वरी पूर्व येथील पूनमनगर येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये सुरू केली. या शाळेला मिळालेला प्रतिसाद पाहून मुंबईत इतर ठिकाणी या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. २०२१मध्ये आणखी १० ठिकाणी शाळा सुरू केल्या. तसेच ‘आयसीएसई’, ‘आयबी’ आणि ‘केंब्रिज आयजीसीई’ बोर्डाची प्रत्येकी एक शाळा सुरू केली. ‘सीबीएसई’ शाळांना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता, गेल्या वर्षी या शाळांमधील लहान शिशू आणि बालवाडी वर्गांच्या तुकड्यांत वाढ करण्यात आली होती. त्यामुळे तब्बल ९६० जागा वाढल्या. मात्र तरीही ‘सीबीएसई’ शाळांची मागणी वाढत असून, अधिकाधिक शाळा सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे.

    कलागुणांना प्रोत्साहन

    मुलांमध्ये कलागुण वाढीस लागावेत, यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. शाळांमध्ये गायन, वादन, नृत्य आदी संगीत विषय बाबींसाठी स्वतंत्र वर्गखोल्या राहतील. त्याचबरोबर प्रसारमाध्यम अभ्यास, छायाचित्रणकला, शिल्पकला, चित्रकला, शिवणकाम, सुतारकाम इत्यादी अभ्यासक्रमांसाठीही स्वतंत्र वर्गखोल्या असतील, अशी माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

    दसरा मेळाव्यासाठी शेकडो एसटी बस, ८०० जणांकडून १० कोटी खर्च, एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed