• Sat. Sep 21st, 2024
गिरीश महाजनांनी गळ घातली, इतक्यात मनोज जरांगे हात जोडून म्हणाले, मेलो तरी चालेल, पण…

म.टा. प्रतिनिधी, जालना: ‘राज्य सरकार आरक्षणाच्या बाजूने आहे. एक महिन्याचा वेळ द्या,’ असे आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर उपस्थितांना केले. मात्र, ‘मराठवाड्याला दोन दिवसांत आरक्षण द्या,’ अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. दोन तास झालेल्या चर्चेतून काही निष्पन्न झाले नाही. या वेळी आमदार नीतेश राणे, सतीश घाटगे, अविनाश मांगदरे यांची उपस्थिती होती.

महाजन यांनी उपोषण सोडण्याबाबत आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली; तसेच सरकारचा प्रस्ताव घेऊन आंदोलन स्थळी आल्याचे सांगितले. ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्याशी संवादही साधला आहे. महिनाभरात राज्य सरकार तुमच्या आंदोलनाची दखल घेईल. तुम्ही सरकारला वेळ द्यावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्याशी चर्चा करतील,’ असेही महाजन म्हणाले.

मात्र, मनोज जरांगे यांनी हात जोडून विनंती करीत म्हणाले, ‘मी मराठा आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने उपोषण करीत होतो. मात्र, आमच्यावर पोलिसांकडून लाठीहल्ले करण्यात आले. लहान मुले, महिला, वयोवृद्ध यांना बेदम मारहाण झाली. इतकेच नाही, तर छर्रे आणि गोळीबार करण्यात आला. आता आंदोलनात माघार नाही. मेलो तरी चालेल; पण मी आरक्षण मिळेपर्यंत माझे उपोषण सोडणार नाही. माझ्या मराठा बांधवासाठी आणि समाजासाठी माझी बांधिलकी कायम आहे. दोन दिवसांत माझ्या मराठवाड्यातील बांधवाला आरक्षण द्या आणि टप्याटप्याने महाराष्ट्राला तीन महिन्यांत आरक्षण द्यावे.’

Maratha Morcha: पोलिसांची गुप्तचर यंत्रणा फेल, मनोज जरांगेची ताकद ओळखण्यात चूक, मराठा आंदोलन कसं पेटलं?

लाठीमाराची पोलिस चौकशी

जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची पोलिसांच्या कायदा व सुव्यवस्था विभागाच्या अपर पोलिस महासंचालकांमार्फत चौकशी करण्याचा निर्णय रविवारी जाहीर केला. तसेच लाठीमाराची जबाबदारी निश्चित करीत जालन्याचे अपर पोलिस अधीक्षक आणि उपअधीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याचेही आदेश दिले असून, अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे काढलेल्या मोर्चावर झालेल्या पोलिस लाठीमाराचे राज्यभर पडसाद उमटल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी रविवारी बुलढाण्यात येऊन परिस्थितीबाबत चर्चा केली व तातडीने काही निर्णय जाहीर केले. ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात शिंदे यांनी जालन्यातील लाठीमाराच्या मुद्द्यावर ठोस कारवाईचे आदेश दिले. यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जारी केले. तसेच अपर पोलिस अधीक्षक आणि उपअधीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याचेही निर्देश देण्यात आले. लाठीमाराच्या प्रकरणाची अपर पोलिस महासंचालक (कायदा-सुव्यवस्था) संजय सक्सेना यांच्यामार्फत चौकशी करण्याचाही निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केला.

हॉटेलात काम, चळवळीसाठी जमीन विकली, आरक्षणासाठी ३० हून अधिक आंदोलने, मनोज जरांगे पाटील कोण?

‘मराठा आंदोलकांवर झालेला लाठीमार ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल आणि कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. आवश्यकता भासल्यास या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल’, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

‘मी सर्वसामान्य मराठा कुटुंबात जन्माला आलो. मराठा समाजाच्या वेदनांची मला पूर्ण जाण आहे. मराठा समाजासाठी टिकेल, असे आरक्षण मिळावे यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे. याबाबत सकारात्मक निर्णय होईल’, असे त्यांनी सांगितले. ‘मराठा समाजाचा ज्यांनी कायम गळा घोटला, तेच आज त्यांच्यासमोर गळा काढत आहेत. काल जे जालन्यात आले होते, त्यापैकी अशोक चव्हाण हे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या अडीच वर्षांच्या काळात काय केले? मराठा समाजाने काढलेल्या शांततापूर्ण मूक मोर्चांची ‘मुका मोर्चा’ अशी हेटाळणी कुणी केली? जालना येथील आंदोलन शांततापूर्ण मार्गाने सूरू असताना नक्की दगडफेक कुणी केली, याचीही माहिती समोर येत आहे. मराठा आंदोलनाच्या आडून कोण आपली राजकीय पोळी भाजून घेत आहे, तेही लवकरच समजेल’, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

‘मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर साडेतीन हजार मराठा तरुण हे नोकरीपासून वंचित राहिले होते. त्यांना न्याय देण्यासाठी अधिसंख्य पदे भरण्याचा निर्णय आम्ही घेतला. सर्वसामान्य मराठा तरुणांना न्याय देण्यासाठी जेव्हा सगळे नेते गप्प होते, तेव्हा न्यायालयाच्या अवमानाची पर्वा न करता आम्ही हा निर्णय घेतला. त्यामुळे मराठा समाजाला आपल्या पाठीशी नक्की कोण आहे, याची पूर्ण कल्पना आहे’, असा टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed