जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी, विविध शोध लावण्याची जिज्ञासा निर्माण व्हावी या हेतुने शिक्षण विभागाने ‘इनोव्हेशन अँड लर्निंग सेंटर’ उभे केले. याद्वारे विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, कोडिंग, अवकाश तंत्रज्ञान, थ्रीडी प्रिंटरबाबतचे ज्ञान दिले जाणार आहे. कृतीयुक्त शिक्षणातून विद्यार्थ्यांना याची माहिती व्हावी यासाठी या सेंटरद्वारे नियोजन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ५५ प्राथमिक, तर ५२ उच्च प्राथमिक शाळांची निवड करण्यात आली आहे. या शाळांना रोबोटिक्स आणि कोडिंगचे साहित्यही देण्यात आले. रोबोटिक साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांना रोबोटिक्स व कोडिंग विषयाचे शिक्षकांना अध्यापन करता यावे, यासाठी निवडक शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात आले. शासकीय अध्यापक महाविद्यालयामध्ये झालेल्या या प्रशिक्षणात तंत्रस्नेही शिक्षकांसोबतच विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांनीही सहभाग नोंदवला. यामध्ये शिक्षकांकडून बेसिक आणि ॲडव्हान्स्ड रोबोट बनवून घेण्यात आले. कोडिंगद्वारे प्रोग्राम सेट करून रोबोट बनवून घेतले. शिक्षकांनी स्वयंचलित कार, क्रेन, रिक्षा अशा विविध प्रकारच्या प्रतिकृती बनवल्या व त्याचा वापर करून दाखवला.
आरक्षित जागांवरील बांधकामांना दिलासा
शहराच्या एकत्रित विकास आराखड्याच्या प्रस्तावित जमीन वापर नकाशातून (पीएलयू) ग्रीन झोनसह विविध आरक्षित जागांवरील बांधकामे वगळण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ग्रीन झोनसह अन्य अरक्षणे शहराच्या विस्तारित भागांमध्ये टाकण्यात आल्याचेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आरक्षित जागांवर बांधकाम करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे, असे मानले जात आहे.
ग्रीन झोनसह विविध आरक्षित भूखंडांवरील बांधकामे गुंठेवार विकास अधिनियमांतर्गत नियमित करण्याची भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली आहे. यासाठी प्रशासनाने सरकारचे मार्गदर्शनदेखील मागितले आहे. मूळ शहर आणि विस्तारित शहर याचा एकत्रित विकास आराखडा तयार करण्याचे काम करताना डीपी युनिटने पीएलयू तयार केला. तयार केलेला पीएलयू सरकारला सादर करण्याची तयारीदेखील या युनिटने दाखवली आहे. पीएलयू तयार करताना ग्रीन झोन आणि आरक्षित जागांवर नागरिकांनी केलेल्या बांधकामांना अभय देण्याचे काम करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. पीएलयू तयार करताना ही आरक्षणे उठवण्यात आल्याची माहितीही मिळाली आहे. आरक्षणे उठवल्यामुळे या जागांवरील बांधकामे नियमित होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. उठवण्यात आलेल्या आरक्षणांचे समायोजन पीएलयू मध्ये शहराच्या विस्तारित भागांत करण्यात आल्याचे समोर आले आहे. शहराच्या विस्तारित भागात जास्तीत जास्त आरक्षणे असण्याची शक्यता आहे.
डीपी युनिटच्या ‘पीएलयू’चे भवितव्य काय?
शहराचा एकत्रित विकास आराखडा तयार करण्यासाठी सरकारने आता स्वतंत्र अधिकारी नियुक्त केला आहे. डीपी युनिटने केलेले काम या अधिकाऱ्याला सादर करावे लागणार आहे. विद्यमान जमीन वापर नकाशापर्यंतचे काम (एएलयू) स्वतंत्र अधिकाऱ्याकडे सादर करा, असे निर्देश सरकारने दिले आहेत. त्यामुळे डीपी युनिटने तयार केलेल्या ‘पीएलयू’चे भवितव्य काय असेल, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
आनंदाचा शिधा पुढील आठवड्यापासून
दिवाळी, गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रमाणेच राज्य सरकारने गौरी गणपती सणासाठी लाभार्थी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना शंभर रुपयांत आनंदाचा शिधा संच देण्याची घोषणा केली आहे. शासनाने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने जिल्ह्याला आतापर्यंत साखर, दाळ, रवा यासह काही प्रमाणात खाद्यतेलाचा पुरवठा केला आहे. तर काही संच मागील शिल्लक असून उर्वरित तेलाचा पुरवठा सोमवारपर्यंत होणार आहे. तर गोडावूनमध्ये संच पुरवठा झाला असून येत्या चार ते पाच दिवसात रेशनदुकानदारांमार्फत लाभार्थ्यांना संचाचे वाटपास सुरुवात होईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात १ हजार ८१० रेशन दुकाने कार्यरत असून ५ लाख ४२ हजार ९२१ शिधापत्रिकाधारक आहेत. या लाभार्थ्यांमध्ये अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका ६२ हजार ९५३, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक ४ लाख १२ हजार ४३३ आणि शेतकरी शिधापत्रिकाची संख्या ६७ हजार ३३५ आहे.
शासनाने गेल्या दिवाळी सणा निमित्ताने व त्यानंतर गुढीपाडवा सण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्तानेही रेशनच्या धान्यास पात्र असलेल्या कार्डधारकांना आनंदाचा शिधा म्हणून केवळ शंभर रुपयामध्ये साखर, हरभरा डाळ, रवा प्रत्येकी एक किलो आणि एक लिटर पामतेल असा संच वाटप केले होते. परंतु त्यावेळी कंत्राटदाराकडून वेळेवर साहित्याचा पुरवठा न झाल्याने संच वाटपात काहीसा विलंब झाला होता. दरम्यान, शासनाने आता गौरी – गणपती सणाताही आनंदाचा शिधाचे वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने गेल्या काही दिवसापासून तयारी सुरु केली असून यंदा ५ लाख ४२ हजार ९२१ संचाची मागणी नोंदविण्यात आली आहे. रवा, साखर, हरभरा डाळीचा पुरवठा झाला आहे. काही प्रमाणात खाद्यतेलाचा साठाही आला असून उर्वरित साठा दोन दिवसात येईल तर मागील काही साठा शिल्लक असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगितल्या जात आहे. तर संचाचा पुरवठा या तीन ते पाच दिवसात रेशन दुकानदारांना होईल व त्यानंतर लाभार्थ्यांना संचाचे वाटप केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.