मसापची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झाली. परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे आणि राजीव बर्वे, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होते. परिषदेची समाजमाध्यमांवर बदनामी करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जोशी यांनी देताच सभेत वादाची ठिणगी पडली. सभासद विजय शेंडगे आणि राजकुमार धुरगुडे-पाटील यांनी कार्याध्यक्षांच्या भूमिकेवर आक्षेप घेताच काही सभासदांनी त्यांना विरोध केला. काहींनी मध्यस्थी केल्याने हमरीतुमरीचे रूपांतर हाणामारीत झाले नाही. या गोंधळामुळे ‘लोकशाहीचे दर्शन घडले,’ अशी टिप्पणी डॉ. रावसाहेब कसबे यांनी केली.
‘कार्यकारिणीला पाच वर्षांच्या मिळालेल्या मुदतवाढीवर आम्ही आक्षेप घ्यायचा नाही काय, सभासदांना व्यक्त होण्याचा अधिकार नाही का,’ असे प्रश्न विजय शेंडगे आणि राजकुमार धुरगुडे यांनी उपस्थित केले. यावर जोशी यांनी ‘कार्यकारी मंडळाने लोकशाहीविरोधी काहीही केले नाही,’ असे स्पष्ट केले. पुरस्कार न दिल्याने पदाधिकाऱ्यांना जाब विचारणाऱ्यांची नावे जाहीर करण्याची भूमिका जोशी यांनी घेताच वाद आणखी पेटला. सभासदांना बोलू न देण्याच्या कार्यपद्धतीमुळे हीच का लोकशाही, अशा शब्दांत शेंडगे यांनी टीकास्र सोडले. साहित्य परिषदेच्या कामाबाबतच्या शंका सुसंस्कृत पद्धतीने विचाराव्या. साहित्य परिषदेचा सभासद होण्यासाठी पहिली पात्रता सुसंस्कृत असण्याची आहे, अशी टिप्पणी कसबे यांनी केली.
‘घटना दुरुस्ती होणार’
‘पुढील पन्नास वर्षांचा विचार करून येत्या मार्चपर्यंत घटना दुरुस्ती होणार आहे. घटना समितीने हा अहवाल कार्यकारी मंडळाला दिला आहे. परिषदेच्या आजीव सभासदांची संख्या २० हजारांहून अधिक असल्याने यापुढे परिषदेच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्या क्रियाशील कार्यकर्त्यांनाच सभासदत्व देण्यात येणार आहे. परिषदेच्या निष्क्रिय शाखांचे विलीनीकरण उपक्रमशील शाखेमध्ये करण्यात येणार आहे,’ अशी माहिती कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. महाराष्ट्र साहित्य पत्रिकेतील शंभर वर्षांतील निवडक लेख आणि संमेलनाध्यक्षांची भाषणे हा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या सभेत कार्यकारिणीला पाच वर्षांच्या मुदतवाढीचा ठराव मंजूर झाला होता. या कार्यकारिणीने चांगले काम केले नाही, तर राजीनामा देईन, असे मी म्हणालो होतो. मात्र, हे पदाधिकारी चांगले काम करीत असल्याने राजीनाम्याचा प्रश्न येतोच कुठे? – डॉ. रावसाहेब कसबे, अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद..