• Sat. Sep 21st, 2024

जिल्हा विकासाचे प्रस्ताव तातडीने सादर करा- पालकमंत्री भुमरे यांचे निर्देश

ByMH LIVE NEWS

Aug 31, 2023
जिल्हा विकासाचे प्रस्ताव तातडीने सादर करा- पालकमंत्री भुमरे यांचे निर्देश

औरंगाबाद, दि.31(जिमाका)- मराठवाडा मुक्तिसंग्राम सांगता सोहळ्यानिमित्त राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत जिल्ह्यात राबवावयाच्या विविध विकास योजनांचे प्रस्ताव संबंधित यंत्रणांनी तयार करुन तातडीने जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्याचे निर्देश राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री तथा पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज दिले.

पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज  स्मार्ट सिटी कार्यालयात मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद जिल्ह्यातील सादर करावयाच्या प्रस्तावांबाबत आढावा घेतला.

या बैठकीस गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार, विधानसभा सदस्य आ. हरिभाऊ बागडे,  आ. प्रदीप जयस्वाल, आ. रमेश बोरनारे,पोलीस आयुक्त मनोज लोहिया, जिल्हाधिकारी औरंगाबाद आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे तसेच सर्व संबंधित विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री भुमरे म्हणाले की, नियोजित मंत्रिमंडळाच्या बैठकीनिमित्त जिल्ह्याचे विविध प्रश्न मांडण्याची व सोडवणूक करण्याची संधी मिळणार आहे. या अनुषंगाने प्रत्येक विभागाने विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती, त्यासाठी लागणारा निधी याबाबतची माहितीचा परिपूर्ण प्रस्ताव विहित कालमर्यादेत सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

अंगणवाडी मदतनीसांना पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचे वितरण

जिल्हा परिषदेअंतर्गत अंगणवाडी मदतनीस या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात निवड झालेल्या 106 अंगणवाडी मदतनीसांना जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्राचे वितरण करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी रोहयो अर्चना खेतमाळीस, महिला बालविकास अधिकारी शिवाजी वने तसेच अन्य अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी निवड झालेल्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed