गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या दहशतीमुळे तरुणाने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला. तशी फिर्याद संजय तुकाराम खुळे याने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी प्रदीप भाऊसाहेब शिंदे, संदीप उर्फ संतोष शिवाजी दिघे, पोपट उर्फ बाजीराव सावळेराम कोल्हे, नानासाहेब कोल्हे या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादित म्हटले आहे की, या लोकांनी ग्रामपंचायत कार्यालयात नितीन खुळे याला बोलावू घेऊन दमदाटी केली. दमदाटी करणारे ग्रामपंचायतचे पदाधिकारी नाहीत, तरीही ग्रामपंचायतमध्ये हस्तक्षेप करतात. नितीन खुळे याला लग्नासाठी मुलगी पाहिली होती. तिच्याबरोबर लग्न करण्याचे ठरले होते. मात्र मुलीच्या घरच्यांनी नंतर लग्न मोडले, असे कळविले. त्या मुलीचे लग्न संदीप शिवाजी दिघे याचे बरोबर होणार असल्याचे कळाल्याने नितीन यास राग आला. त्याने संदीप यास शिवीगाळ केली. त्यानंतर नितीन यास ग्रामपंचायतीमधून फोन आला. त्याला ग्रामपंचायतीमध्ये बोलावून घेण्यात आले.
त्यावेळी नितीन यास अमोल अप्पासाहेब दिघे, राजेंद्र देवराम दिघे, जालिंदर मच्छिंद्र दिघे, राहुल भास्कर दिघे, सुधाकर बलसाने यांनी बोलावून दमदाटी केली. थोड्या वेळात नितीन ग्रामपंचायतीबाहेर रडत आला. त्यानंतर त्याची समजूत काढून त्याला घरी पाठवून दिले. त्यानंतर नितीन याने कानिफनाथ जंगलातील एका बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. त्याच्याकडे एक डायरी सापडली. त्यात त्याने प्रदीप भाऊसाहेब शिंदे, संदीप उर्फ संतोष शिवाजी दिघे, बाजीराव दिघे (उपसरपंच), नानासाहेब कोल्हे, पोपट उर्फ बाजीराव सावळेराम कोल्हे यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे लिहून ठेवले आहे.खुळे याचा मृतदेह संगमनेर कॉटेज रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. खुळे याचा मोबाईल व त्याच्याजवळ मिळून आलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.