चिमणाराम बेणाराम चौधरी (वय 48), नम्रता चिमणाराम चौधरी(वय 40), भावेश चिमणाराम चौधरी (वय 15), सचिन चिमणाराम चौधरी (वय 13) अशी होरपळून मृत्यू झालेल्या चार जणांची नावे आहेत. अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून देण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, चिमणाराम चौधरी आणि त्यांचे कुटुंब हे राजस्थानवरून पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरात असणाऱ्या पूर्णानगर भागात राहायला आले होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी या ठिकाणी स्वतःचे हार्ड वेअरचे दुकान सुरू केले होते. त्या दुकानातच मागचा भागात ते कुटुंबासमवेत रहात होते. या दुकानात इलेक्ट्रिकचे साहित्य मोठ्या प्रमाणात होते. दोन तीन दिवस ते फिरण्यासाठी बाहेर गेलेले. ते मंगळवारी रात्रीच परतले होते. रात्री जेवण झाल्यानंतर पती-पत्नी आणि दोन मुलं झोपी गेली होती. मात्र आज बुधवारी पहाटेच्या सुमारास शेजाऱ्यांना समजले की, या दुकानात अचानक आग लागली. त्यावेळी कुटुंब गाढ झोपेत होते. आगीने रौद्र रूप धारण केल्याने त्यांना कुठलीही हालचाल करण्यासाठी वेळ मिळाला नाही. त्यातच त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
आगीचे लोट बाहेर पडत असताना शेजारी असणाऱ्या नागरिकांना दिसले. त्यानंतर अग्निशामक दलाला याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवत चारही मृतदेह दुकानातून बाहेर काढले आहेत. राजस्थानवरून पोट भरण्यासाठी आलेल्या चौधरी कुटुंबाचा असा दुर्देवी अंत होईल, असे कुणाच्या मनातही नसेल. सर्वांशी मिळून मिसळून राहण्याचा त्यांचा स्वभाव होता. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.