• Sat. Sep 21st, 2024

वर्ध्याच्या रामनगरात झाला होता पाहुणचार; ज्येष्ठ लेखिका मृणालिनी केळकर यांनी जागवल्या सीमा देव यांच्या आठवणी

वर्ध्याच्या रामनगरात झाला होता पाहुणचार; ज्येष्ठ लेखिका मृणालिनी केळकर यांनी जागवल्या सीमा देव यांच्या आठवणी

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : सीमा देव यांच्या मोठ्या बहिणीचे लग्न आमच्या शेजारी राहणारे दिग्दर्शक राजदत्त यांच्याशी जुळले होते. नेमका तेव्हाच ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या नाटकाचा प्रयोग वर्ध्यात होता. प्रयोगाच्या निमित्ताने वर्ध्याला आलेल्या सीमा देव मोठ्या बहिणीच्या सासरी अर्थात रामनगरातील राजदत्त यांच्या घरी आल्या होत्या. तेव्हा रामनगरातील राजदत्त यांच्या घरी पाहुणचार आणि गप्पा दोन्ही रंगल्या होत्या. मुख्य म्हणजे त्याकाळच्या लोकप्रिय अभिनेत्री असूनही त्यांच्या बोलण्यात त्या वलयाचा तसूभरही आविर्भाव नव्हता, अशी आठवण ज्येष्ठ लेखिका-अनुवादक मृणालिनी केळकर यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितली.

‘ही १९६३ ची घटना. राजदत्त आणि आम्ही सख्खे शेजारी. राजदत्त त्यांच्या आईला नानी म्हणत. आम्हीदेखील त्यांना काकूऐवजी नानीच म्हणायचो. तेव्हाच्या काळी शेजाऱ्यांच्या घरी पाहुणे आल्यास मदतीसाठी हमखास आजूबाजूच्या मुलामुलींना बोलावले जायचे. ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या नाटकाचा प्रयोग त्याकाळी वर्ध्यातील लक्ष्मीनारायण मंदिराच्या विरुद्ध दिशेला असलेल्या दुर्गा टॉकीजला होता. नाटकाच्या निमित्ताने सीमा आणि रमेश देव असे दोघेही शहरात आले होते. प्रयोगापूर्वी मोठ्या बहिणीचे सासर पाहावे म्हणून त्या राजदत्त यांच्या घरी आल्या होत्या. तेव्हा राजदत्त यांची बहीण घरी नसल्याने नानीने मला मदतीसाठी बोलावले. मी गेले. तेव्हा झालेली सीमा देव यांची भेट अजूनही मनात जिवंत आहे. सीमा देव यांचे राजदत्त यांच्या घरी येणे, आम्ही त्यांची केलेली सरबराई, त्यांचे बदामी आकाराचे डोळे, निमगोरा रंग, निर्मळ हास्य आणि पांढरी शुभ्र साडी हे सारेच्या सारे आजही तसेच्या तसे आठवते. सीमा आणि रमेश देव या दोघांनीही फार थोडा वेळ आमच्यासोबत घालविला होता. परंतु, त्या संपूर्ण भेटीत कुठेही त्यांच्या स्टारडमचा लवलेश नव्हता. त्यांच्याभोवती असलेल्या ग्लॅमरमुळे आम्ही भारावलेलो होतो. पण, त्यांनी त्यांच्या वागण्या-बोलण्यातून संपूर्ण संवादात सहजता आणली होती’, असे केळकर म्हणाल्या.
त्याचं डोकं अन् तिच्या हातांनी जिंकलं आकाश; हात गमावलेल्या शशिकांत सरोदे अन् अर्धांगिनीची जिगरबाज कहाणी
दिला ‘वैभव’ चित्रपटातील फोटो

राजदत्त यांच्या घरी झालेल्या त्या भेटीदरम्यान सीमा देव यांनी आमच्यासोबत काही फोटो काढून घेतले होते. रमेश देव यांनी त्यांच्या येऊ घातलेल्या ‘वैभव’ चित्रपटातील एक फोटो आम्हाला भेट म्हणून दिला होता. राजदत्त यांच्या पत्नीचा पहिला संक्रांतीचा सण वर्धा येथील घरी झाला होता. त्यावेळी आम्ही मैत्रिणींनी मिळून त्यांच्यासाठी हलव्याचे दागिने तयार केल्याची आठवण या निमित्ताने मृणालिनी केळकर यांनी सांगितली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed