• Sun. Sep 22nd, 2024

बाजार समितीच्या पदाधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी पणन मंडळामार्फत तळेगाव येथे सुविधा उपलब्ध करणार- पणन मंत्री अब्दुल सत्तार

ByMH LIVE NEWS

Aug 24, 2023
बाजार समितीच्या पदाधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी पणन मंडळामार्फत तळेगाव येथे सुविधा उपलब्ध करणार- पणन मंत्री अब्दुल सत्तार

पुणे, दि. 24 : राज्यातील बाजार समितीचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पणन मंडळामार्फत तळेगाव येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्र संस्थेत सुविधा उपलब्ध करण्यात येईल, अशी ग्वाही पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली.

अल्पसंख्याक विकास, औकाफ व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी बुधवारी तळेगाव येथील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेला भेट देवून कामकाजाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे पणन संचालक शैलेश कोथमिरे, राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक तथा सचिव संजय कदम, सरव्यवस्थापक तथा मॅग्नेटचे प्रकल्प संचालक विनायक कोकरे, संस्थेचे संचालक डॉ. सुभाष घुले, मॅग्नेट प्रकल्पाचे उपसंचालक अमोल यादव, संस्थेचे व्यवस्थापक विश्वास जाधव आदी उपस्थित होते.

आढावा बैठकीत श्री. सत्तार म्हणाले, संस्थेने इतर विभागांशी समन्वय साधून, राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी यांना संबंधित विषयावरील प्रशिक्षण देण्यावर भर द्यावा. त्याचबरोबर कृषी पणन मंडळाने राज्यातील बाजार समिती यांच्या पदाधिकारी व अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण आयोजित करावे. प्रशिक्षणासाठी येणारा खर्च कृषी पणन मंडळाने संस्थेला द्यावा, जेणेकरून संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल.

त्याचप्रमाणे संस्थेने जिल्हा बँका, नाबार्ड, कौशल्य विकास  व अल्पसंख्यांक विभागाशी  संपर्क साधून  संस्थेत पूर्ण वर्षभर प्रशिक्षण कार्यक्रम सुरू राहण्यासाठी प्रयत्न करावेत. संस्थेने आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी उपलब्ध  जागेचा पुरेपूर वापर करून नवीन प्रकल्प उभारावेत. संस्थेला पाणी उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषद किंवा एमआयडीसी यांच्याकडे संपर्क साधावा, याकरिता आवश्यक ती मदत करता येईल, असेही त्यांनी यावेळी  सांगितले.

श्री. कोथमीरे यांनी राज्यातील बाजार समितीच्या  पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाबाबत परिपत्रक काढण्यात येईल असे सांगितले. श्री. कदम यांनी संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी सर्वोपतरी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.

यावेळी डॉ. घुले यांनी  संस्थेच्या कामकाजाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

यावेळी मंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed