• Sun. Sep 22nd, 2024

हर्णे येथे मरीन कल्चर पार्क उभारण्यासाठी कालमर्यादेत कामे पूर्ण करावी – उद्योगमंत्री उदय सामंत

ByMH LIVE NEWS

Aug 24, 2023
हर्णे येथे मरीन कल्चर पार्क उभारण्यासाठी कालमर्यादेत कामे पूर्ण करावी – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २४ : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी कोकणात उपलब्ध मत्स्य संपत्तीचा उपयोग रोजगार निर्मितीसाठी व्हावा म्हणून हर्णे येथे प्रस्तावित मरीन  कल्चर पार्कची कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे निर्देश उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.

रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे येथील मरीन कल्चर पार्क संदर्भात मंत्री श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात त्यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार योगेश कदम, उद्योग विकास आयुक्त दीपेद्रसिंह कुशवाह, एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. मलिकनेर, उद्योग सहसंचालक संजय कोरबू, एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र काकुस्ते तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

हर्णे येथे ॲक्वा कल्चर पार्क उभारण्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या सल्लागार संस्थेने सादरीकरण केले.  या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यासाठी  या ठिकाणी किती गुंतवणूक, उलाढाल व रोजगार उपलब्ध होईल याची माहिती पुढील बैठकीत सादर करावी. या प्रकल्पाला मेरीटाईम बोर्डाची मान्यता घ्यावी तसेच यासाठी लागणाऱ्या जमिनीची संपादन प्रक्रिया आठ दिवसांत पूर्ण करावी.

अँकर युनिटसाठी निवडण्यात आलेल्या देशभरातील ६० उद्योजकांमधून उत्तम उद्योजकाची निवड करण्यात यावी.  येथे उद्योग स्थापित करण्यास इच्छुक उद्योगांना केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्य योजनेसोबतच राज्य शासनाच्या मत्स्य विकास धोरणाचा अभ्यास करून त्यातील लाभाची माहिती उद्योगांना द्यावी. राज्य शासनाने मत्स्य विकास धोरणात रत्नागिरीसाठी विशेष श्रेणी तयार केली आहे. यामध्ये वीज, भांडवल,  मुद्रांक शुल्क, वस्तू व सेवाकर याबाबत उद्योगांसाठी असलेल्या राज्य शासनाच्या धोरणाची माहिती उद्योजकांना देण्यात यावी.

या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेत अंतर्गत रस्ते, वीज, पाणी इत्यादी पायाभूत सुविधांची कामे १५ दिवसांत पूर्ण करण्यासही मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

००००

मनीषा सावळे/विसंअ/

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed