• Sat. Sep 21st, 2024

रेल्वे गोदामात नोकरीचे आमिष; समोसे विक्रेत्याने दीड हजार बेरोजगारांना लावला कोट्यावधींचा चुना

रेल्वे गोदामात नोकरीचे आमिष; समोसे विक्रेत्याने दीड हजार बेरोजगारांना लावला कोट्यावधींचा चुना

रायगड: मागील काही महिने रायगड जिल्ह्यात विविध प्रकारे नोकरीचे आमिष दाखवून किंवा पैशाची मागणी करून तरुणांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. आता तर थेट रेल्वे गोदामात नोकरीचे आमिष दाखवून पेण येथील समोसे विक्रेत्याने जवळपास दीड हजार बेरोजगार तरुणांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली असल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती सामोर येत आहे. पेण तालुक्यातील समोसे विक्रेते असणारा संशयित संतोष थोरात यांनी भारतीय रेल्वे माल गोदामात नोकरीचे आमिष दाखवून हजारो बेरोजगार तरुणांची फसवणूक केली असल्याची लेखी तक्रार सामजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांनी पेण पोलिस ठाण्यात केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

पेण पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल चौकशी करून आणि कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा व फसवणूक झालेल्या तरुणांना न्याय द्यावा अशी मागणी केली असल्याचे बेकावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हरिष बेकावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलेल्या माहितीनुसार, पेण येथील समोसे विक्रेते संतोष थोरात आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी भारतीय रेल्वे माल गोदाम श्रमिक संघा तर्फे नोकरीचे आमिष दाखवून संबंधित गोरगरीब तरुण – तरुणी, विवाहित महिला – पुरुष यांच्याकडून गेली एक ते दीड वर्षांपासून फॉर्म भरून रजिस्टर नोंद केली. सुरुवातीस फॉर्म फी म्हणून दोन हजार प्रत्येकी व नोकरी लावण्यासाठी प्रत्येकी पंचवीस हजार रुपये पेणसह रायगड, मुंबई, ठाणे, कोकण मधील लोकांकडून घेतले आहेत. पंधराशेहुन अधिक जणांकडून नोकरीसाठी प्रत्येकी पंचवीस हजार रुपये घेतल्यानंतर आज पर्यंत कोणत्याही बेरोजगार तरुणांना नोकरी दिली नसल्याचे समोर आले आहे. थोरात याने अंदाजे 4 कोटी हुन अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे निदर्शनात येत आहे.

ऑनलाइन गेमच्या नावाखाली फसवणूक, बिझनेस पार्टनरनेच ५८ कोटींना घातला गंडा

पैसे भरुन अनेक महिने झाल्यानंतर देखील नोकरी मिळत नसल्याने तसेच नोकरी मिळण्याची कोणतीही शक्यता दिसत नसल्याने अनेक बेरोजगारांनी फोन केल्यानंतर व प्रत्यक्ष भेट घेतल्यावर काही बेरोजगारांना भारतीय रेल्वे माल गोदाम श्रमिक संघाचे ओळखपत्र दाखवले जाते. तर काहींना नमुना म्हणून ओळखपत्र दिले जाते. त्यानंतर पंचवीस हजार रुपये घेऊन तीन महिन्याचे आत भारतीय रेल्वे कार्यालयाकडून नोकरीचे भरतीचे पत्र आपणास शंभर टक्के मिळेल अशी खात्री देऊन फसवणूक केली जात आहे. मात्र प्रत्यक्षात पंधराशे पैकी आजपर्यंत एकाही बेरोजगाराला रेल्वे माल गोदमात नोकरी दिली नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असलेल्या भारतीय रेल्वे माल गोदामात नोकरी लावण्याचे शिक्षण, वय असे कोणतेही निकष देखील थोरात याने पाळले नाहीत. काही बेरोजगारांचे सरकारी नोकरी मिळण्याचे वय देखील उलटून गेले आहेत अशा बेरोजगारांकडून देखील फॉर्म भरून पैसे घेण्यात येऊन त्यांची फसवणूक केली असल्याचे हरीश बेकावडे यांनी सांगितले.

पेण मधील फणसडोंगरी येथील एका छोटयाशा कौलारू ऑफिसमध्ये रेल्वेत नोकरी देण्याच्या अमिषाने हजारो बेरोजगारांची फसवणूकी बाबत सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांनी पेण पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. या फसवणुकीच्या प्रकाराबाबत तत्काळ कायदेशीर कारवाई करून संतोष थोरात यांच्याकडे गेल्या वर्षभरापासुन असलेली रजिस्टर नोंद महिती घेउन संबंधितांकडून त्याबाबत विचारणा करुन त्यांच्यावर व अन्य सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

रिक्षा चालकाचीही केली फसवणूक

या बाबत तळा तालुक्यातील रिक्षा चालक भाऊराव घाग या बेरोजगार तरुणाने देखील संतोष थोरात याच्या अमिषाला बळी पडून आपले व पत्नीचे फॉर्मचे 2000 व रेल्वे गोदामात नोकरी लागण्याचे 25000 असे मिळून 54 हजार रुपये संतोष थोरात याला दिले होते. मात्र सहा महिने झाले तरी स्वतःला अगर इतर कुणालाही नोकरी मिळाली नसल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी संतोष थोरात व सहकारी यांचे विरोधात उपविभागीय पोलीस कार्यालय पेण येथे लेखी तक्रारी अर्ज आहे. यावेळी डीवायएसपी शिवाजी फडतरे यांनी तात्काळ पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. यावेळी संतोष थोरात व तक्रारदार यांना समोरासमोर पोलीस स्टेशनला बोलवले असता त्याने भाऊराव घाग यांचे आपण रेल्वे गोदामात नोकरी लावण्यासाठी पैसे घेतले असल्याचे कबूल करुन घेतलेले 54 हजार रुपये त्यांना रोख परत केले.

पोलिसांनी संतोष थोरात याच्याकडील बेरोजगार तरुणांना केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असलेल्या भारतीय रेल्वे माल गोदामात नोकरी लावण्याचे शिक्षण, वय असे विचारले असता कोणतेही निकष देखील थोरात याने पाळले नाहीत. काही बेरोजगारांचे सरकारी नोकरी मिळण्याचे वय देखील उलटून गेले असून अशा बेरोजगारांकडून देखील पैसे घेण्यात आले आहेत, सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांनी सांगितले. पोलिसांनी नोकरी लावण्याची नावे असलेले रजिस्टर, लॅपटॉप, मोबाईल व इतर वस्तू देखील चौकशीसाठी ताब्यात घेतले असून पेण पोलिसांकडून वेगाने अधिक तपास सुरू आहे.

आर्थिक फसवणूक झालेल्यांना पोलिसांनी केले आवाहन
आर्थिक फसवणूक झालेल्या तरुणांनी पेण पोलिस स्टेशनला संपर्क साधून लेखी तक्रार करावी. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

– देवेंद्र पोळ, पोलीस निरिक्षक, पेण

अश्लील शेरेबाजी-इशारे, डॉक्टर तरुणीने थेट ११२ वर फोन लावला, रोडरोमिओला जन्माची अद्दल घडली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed