छत्रपती संभाजीनगर आरटीओ कार्यालयाच्या परिसरात असलेल्या जुन्या इमारतीला रंगरंगोटी करून विभागीय लायसन्स, आरसी बुक सेंटरसाठी जागा देण्यात आली आहे. राज्यातील आरसी बुक आणि लायसन्स छपाईचे कंत्राट कर्नाटकातील एका एजन्सीला देण्यात आले आहे. दर दिवशी ही एजन्सी ४५ हजार नवीन आरसी आणि लायसन्सची प्रिंट देणार आहे. यापूर्वी हा कंत्राट दुसऱ्या एका एजन्सीकडे होता.
या नवीन एजन्सीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर आरटीओ कार्यालयातील नवीन जागेवर प्रिंटर आणि संगणक लावण्यात आलेले आहे. याशिवाय आणखी सहा संगणक लावण्यात येणार आहेत. मराठवाड्यासह इतर भागात छत्रपती संभाजीनगर येथून आरसी व लायसन्स पोस्टाद्वारे पाठविण्यात येणार आहे. दररोज सहा हजार आरसी आणि लायसन्स पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ही प्रिंटींग सेवा आगामी काही दिवसांत सुरू केली जाणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय कोठुळे यांनी दिली.
आरटीओ कार्यालयांतर्गत नवीन लेझर प्रिटिंग करून लायसन्स किंवा आरसी बुक ग्राहकांना दिली जाणार आहे. या लेझर प्रिंटिंगमुळे सध्याच्या आरसी बुक किंवा लायसन्सवरील अक्षरे अस्पष्ट किंवा अंधुक होणार नाहीत. लायसन्सच्या स्मार्ट कार्डसाठी आणि आरसी बुकच्या प्रिंटसाठी प्रतिकार्ड ६४ रुपये घेण्यात येणार आहे, अशीही माहिती आरटीओ विभागाकडून देण्यात आली आहे. पूर्वीच्या स्मार्ट कार्डमध्ये चिप देण्यात येत होती. यंदाच्या स्मार्ट कार्डमध्ये चिप नसून, बारकोड देण्यात आले आहे.
नवीन स्मार्ट कार्ड प्रिंटिंगसाठी छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अंधेरी पश्चिम अशी तीन कार्यालये आहेत. छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक परिवहन कार्यालयात तयार होणारी आरसी बुक आणि लायसन्स स्मार्ट कार्ड तयार करण्याचे काम काही दिवसांत सुरू होणार आहे. या कार्यालयातून लायसन्स आणि आरसी बुक मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र व खान्देशात पाठविण्यात येणार आहे, अशीही माहिती आरटीओ विभागाकडून देण्यात आली.
निरक्षर सर्वेक्षणावर बहिष्कार
राज्यातील १५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या निरक्षर स्त्री व पुरुषांच्या सर्वेक्षणावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक संघाने बहिष्कार घातला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश हिवाळे यांनी दिली. या संदर्भात जिल्हा परिषदेचे प्रशासक विकास मीना व शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांची प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने सोमवारी भेट घेतली.
जिल्हाध्यक्ष राजेश हिवाळे, कैलास गायकवाड किशोर पळसकर, प्रशांत हिवर्डे, प्रकाश साळवे, शमीम पठाण, प्रदीप मोरे आदींची या वेळी उपस्थिती होती. इंदू लॉन्स नाशिक येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची राज्य स्तरीय बैठक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय नेते संभाजीराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात रविवारी झाली. बैठकीत निरक्षर सर्वेक्षणावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामामुळे शिक्षकास अध्यापनास वेळच मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मतदार नोंदणी, जनगणना, निवडणूक यासह जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेने वेळोवेळी मागितलेली माहिती. वेगवेगळ्या प्रकारची ऑनलाइन माहिती यासह शिक्षकांना ३१ प्रकारची वेगवेगळी अशैक्षणिक कामे करावी लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होत आहे. निरक्षर लोकांना साक्षर करण्याच्या प्रयत्नात शाळेत येणारे सहा ते १४ वयोगटातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी निरक्षर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हा बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, असे सांगण्यात आले. वेगवेगळ्या प्रकारची अशैक्षणिक कामे इतर यंत्रणेकडून घ्यावीत व शिक्षकांना फक्त अध्यापनाचे काम द्यावे, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली असल्याचे हिवाळे यांनी सांगितले.
तलाठी परीक्षार्थींना मनस्ताप
तलाठी परीक्षेत सोमवारी तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा सत्रांचे वेळापत्रकच विस्कळीत झाले. परीक्षेसाठी आलेल्या हजारो विद्यार्थ्यांना तासनतास ताटकळत बसावे लागले. राज्यभरात विविध केंद्रांवर विद्यार्थ्यांची ससेहोलपट झाली. छत्रपती संभाजीनगरात सात परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे हाल झाल झाले. विविध जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांसह पालकांना मनस्ताप सहन करावा लागला. शहरात सात परीक्षा केंद्रावरून ४ हजार ३९८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
राज्यातील विविध जिल्ह्यातील तलाठी पदांसाठी परीक्षा सुरू आहे. परीक्षा शुल्काबाबत राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे. त्यातच तीन प्राधान्यक्रम दिल्यानंतरही इतर जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांना देण्यात आले. त्याबाबतही नाराजी असतानाच सोमवारी परीक्षेत तांत्रिक अडचणींमुळे राज्यभरात गोंधळ उडाला. सर्व्हरच्या समस्येमुळे परीक्षा सत्रांचे वेळापत्रच ठप्प पडले. सर्व्हरमुळे सकाळचे सत्र उशिराने सुरू झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांची धांदल उडाली. विविध जिल्ह्यातून परीक्षेसाठी शहरात आलेले विद्यार्थी, पालकही काही तास ताटकळले. सुरुवातीला परीक्षा केंद्रावर याबाबत स्पष्ट सांगण्यात येत नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही काय सुरू आहे कळेना. विद्यार्थ्यांचा संताप वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्व्हर डाऊनबाबत सांगण्यात आल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. परीक्षेतील या प्रकाराबाबत पालकही संताप व्यक्त करत होते. काहीवेळानंतर तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर परीक्षा घेण्यात आली. शहरात विविध जिल्ह्यातून परीक्षेसाठी विद्यार्थी आले होते. ट्रॅव्हल्सच्या तिकीटासाठी अधिकचे पैसे देत विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले. त्यात शहरातील परीक्षा केंद्रावर पोहण्यासाठीही विद्यार्थ्यांना जास्तिका खर्च झाल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील परीक्षार्थी होते. शहरातील विविध केंद्रावरुन ५ हजार १८४ विद्यार्थ्यांची सोमवारी परीक्षा होती. विविध तीन सत्रात ४ हजार ३९८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.