• Fri. Nov 15th, 2024

    दिव्यांगांच्या सर्व समस्या मार्गी लावू – आमदार बच्चू कडू

    ByMH LIVE NEWS

    Aug 21, 2023
    दिव्यांगांच्या सर्व समस्या मार्गी लावू – आमदार बच्चू कडू

    अमरावती दि. 21 : दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी जे काही आवश्यक आहे, ते सगळे हे दिव्यांग विभाग करेल. शासनाच्या विविध योजनेचा लाभ प्रत्यक्ष दिव्यांगांपर्यंत पोहोचू. तसेच त्यांच्या सर्व समस्यां प्राध्यान्याने मार्गी लावू, अशी ग्वाही अभियानाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिली.

    जिल्ह्यात ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियानातंर्गत दिव्यांग मेळाव्याचा  शुभारंभ शासकीय स्त्री रुग्णालय जवळ, नेमानी इन सभागृहात झाला. या कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ.निधी पाण्डेय, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महानगरपालिका आयुक्त देवीदास पवार, उपजिल्हाधिकारी अनंत भटकर, समाजकल्याण विभाग प्रादेशिक उपायुक्त सुनिल वारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर, तहसिलदार विजय लोंखडे आदी उपस्थित होते.

    श्री. बच्चू कडू म्हणाले, ‘राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय असावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. मुख्यमंत्री यांनी दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्यासाठीची कार्यवाही अल्पावधीत पूर्ण केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो’. दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी अशाप्रकारे स्वतंत्र महामंडळ स्थापन करणारं पहिले राज्य आहे.  दिव्यांगासाठी स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणे, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबविणे, त्यांना आत्मनिर्भर करणे, स्वाभिमानाने उभं करणे हाच दिव्यांग विभागाचा उद्देश आहे. तसेच दिव्यांगांच्या सूचनांप्रमाणे लवकरच दिव्यांगाचे धोरण ठरवणार असल्याचेही श्री. कडू यांनी सांगितले.

    दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हास्तरावर शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी, सर्व शासकीय यंत्रणा एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगांच्या तक्रारी जाणून घेऊन त्याच ठिकाणी कामाचा निपटारा करण्यासाठी दिव्यांग मेळावा राबविण्यात येत आहे. ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचे समस्या निराकरण झाले नाही अशा दिव्यांगाचे समस्या तालुक्यास्तरावर मार्गी लावण्यात येईल. येत्या नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत युडीआयडी कार्ड मिळेल याकरीता प्रशासनाने प्रयत्न करावे. तसेच जिल्हा वार्षिक योजनेसह विविध योजनांमध्ये दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी राखीव ठेवण्यात येत असून या निधीच्या माध्यमातून दिव्यांगांना स्वावलंबी, स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन श्री. बच्चू कडू यांनी केले. त्यानंतर प्रत्यक्ष दिव्यांगापर्यंत जावून त्यांचे तक्रारी व समस्या जाणून घेतल्या.

    प्रास्ताविकात जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर म्हणाले, दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना, विविध लाभ व तक्रारीचा निपटारा करण्यासाठी मेळाव्यामध्ये प्रत्येक शासकीय कार्यालयाव्दारे शासकीय योजनांचे स्टॉल लावण्यात आले आहे. तसेच दिव्यांगाच्या विविध योजनांबाबतच्या माहिती पुस्तिकेचे वितरण करणे, संजय गांधी निराधार योजना, जात प्रमाणपत्र, पॅन कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, मतदार नोंदणी, दिव्यांगांना युडीआयडी (UDID) कार्ड वितरण, दिव्यांगांसाठी नवीन शिधा पत्रिका, शिधा पत्रिका मधील इतर फेरफार व नवीन नाव समाविष्ट करणे, दिव्यांगांना रोजगाराच्या संधी, बँकेतील कर्ज प्रकरणे, रोजगार नोंदणी इत्यादी लाभ दिव्यांगाना मेळाव्यात  देण्यात येणार असल्याची माहिती दिली.

    या कार्यक्रमास दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संपूर्ण कार्यक्रम दिव्यांग बांधवांसाठी सांकेतिक भाषेमध्ये प्रशिक्षकाच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आला.

    दिव्यांगाचा मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; 6 हजार दिव्यांगांनी केली नोंदणी

    प्रातिनिधीक स्वरूपात प्रत्येकी दोन दिव्यांगांना व्हिल चेअर, श्रवणयंत्र, यूडीआयडी कार्ड वितरण व धनादेशांचे वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.तसेच दिव्यांग मार्गदर्शिका पुस्तिकेचे विमोचन यावेळी करण्यात आले. दिव्यांग मेळाव्यामध्ये 6 हजाराहून जास्त  दिव्यांग व्यक्तींनी आज नोंदणी केली, तर त्यांच्या सोबत अन्य नातेवाईक, पालक यांनी मोठया संख्येने विविध स्टॉलवर भेटी दिल्यात. रोजगाराच्या संधी, रोजगार नोंदणी, उपलब्ध नोकरी आणि त्याचे स्वरूप याचा लाभ दिव्यांग बांधव भगिनींनी घेतला. विविध विभागांनी आपल्या स्टॉलच्या माध्यमातून दिव्यांगांसाठीच्या योजनाची माहिती दिली. विशेष करून आरोग्य विषयक स्टॉल वर अधिक गर्दी झाली होती. यावेळी दिव्यांग बांधवानी आपल्या आरोग्य तपासीणसुद्धा करुन घेतली. जिल्हा परिषद, महानगपालिका, महसूल विभागाने विविध स्टॉल लावण्यात आले होते. तसेच यूडीआयडीचा स्टॉल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ,  गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण, बार्टी, दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, कृत्रिम अवयव संस्था अशा विविध संस्थांनी स्टॉल लावले होते. त्यास मोठा प्रतिसादही मिळत होता.

    000000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed