• Fri. Nov 15th, 2024

    ‘घरोघरी अधिकारी अभियान’ अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मतदारयादी पडताळणी

    ByMH LIVE NEWS

    Aug 21, 2023
    ‘घरोघरी अधिकारी अभियान’ अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मतदारयादी पडताळणी

    ठाणे, दि.21(जिमाका) : ठाणे जिल्ह्यातील गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिकांची मतदारयादीत 100 टक्के नाव नोंदणी व्हावी, यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून सुरु असलेल्या मतदार नोंदणी, मतदार पडताळणी मोहिमेमध्ये गृहभेटींतर्गत गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ‘मतदार नोंदणी विशेष अभियान’ व ‘घरोघरी अधिकारी’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व इतर कर्मचारी जिल्ह्यातील विविध सोसायट्यांना भेटी देत आहेत.

    या अभियानांतर्गत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जावून कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ-147 च्या मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीमती रेवती गायकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्यांची मतदार यादीमध्ये नाव असल्याची पडताळणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. लता एकनाथ शिंदे, खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी सौ. वृषाली श्रीकांत शिंदे हे उपस्थित होते.

    भारत निवडणूक आयोगाने दि.०१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हे गृहनिर्माण संस्थेमध्ये व्यक्त‍िशः जावून मतदार नोंदणीची प्रक्रिया, मतदार यादीतील तपशिलातील दुरुस्ती. मयत, दुबार व स्थलांतरीत मतदारांची नावे वगळणे, अस्पष्ट छायाचित्रे अद्यावत करणे इत्यादी कार्यवाही करून बिनचूक, अद्यावत व निर्दोष मतदारयादी तयार करण्याचे काम करीत आहेत.

    ठाणे जिल्ह्यामध्ये २८ हजार ३४६ इतक्या गृहनिर्माण सोसायट्या नोंदणीकृत आहेत. या सोसायट्यांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या मतदारांची १००% नोंदणी होणे आवश्यक आहे.  सोसायटीमधील प्रत्येक पात्र व्यक्तीची नोंद मतदारयादीमध्ये होण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय गृहनिर्माण सोसायटी मतदार नोंदणी विशेष अभियान राबवित आहे.

    00000000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed