म.टा.वृत्तसेवा,चंद्रपूर: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील परिचारिकेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. परिचारिका संघटनांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून दोषी डॉक्टर व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सीमा मेश्राम (वय २८) या कायमस्वरूपी परिचारिका म्हणून प्रसूती कक्षात कार्यरत होती. १६ ऑगस्टला रात्रपाळीत ती कामावर असताना तिला भोवळ आली. त्यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी तिला अपघात विभागात दाखल करून उपचार केले. १७ ऑगस्टला सकाळी ११ वाजेपर्यंत कोणतेही मोठे वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात पोहोचले नाही असा आरोप आहे.

दरम्यान, प्रकृती खालावल्याने नातेवाइकांनी सीमाला खाजगी दवाखान्यात दाखल केले. सीमाने तेथील उपचारालाही प्रतिसाद दिला नाही. परिणामी तिला नागपूर येथे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु वाटेतच तिची प्राणज्योत मालवली. उपचारातील हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. मृत्यूची वार्ता परिचारिका वर्गात पसरताच त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले.
राज्य मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटनेनेदेखील या आंदोलनात सहभाग देत पाठिंबा दिला. रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती आहे. या घटनेची चौकशी करून दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांनी केली आहे.