• Sat. Sep 21st, 2024

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

ByMH LIVE NEWS

Aug 15, 2023
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

बुलडाणा, दि. 15 : राज्यात पावसाचा असमतोल निर्माण झाला आहे. काही वेळा जिल्ह्यात एकीकडे अतिवृष्टी तर दुसरीकडे पावसाची कमी नोंद झाली आहे. जिल्ह्‌यातील काही तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर आलेल्या या संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिल, अशी ग्वाही मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

स्वातंत्र्यदिनाच्या 76 व्या वर्धापनदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी आमदार धिरज लिंगाडे, संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, या हंगामात कमी पावसामुळे धरणातही कमी पाणीसाठा निर्माण झाला आहे. यावर्षी काही ठिकाणी चांगला पाऊस तर काही ठिकाणी कमी पावसामुळे पिके धोक्यात आली आहेत. यावर मात करण्यासाठी शासन शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करेल. मागील महिन्यात अतिवृष्टी झालेल्या परिसराला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पूरग्रस्तांना तातडीची मदत, तसेच मदत मिळण्यासाठी पिक नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. बाधीत कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे.

स्वातंत्र्यासाठी देशभरातील स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. स्वातंत्र्यासाठी सर्वस्व गमावलेल्या हुतात्म्यांना त्यांनी अभिवादन केले. गेल्या वर्षी हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात आली. यावर्षी ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ समारोपानिमित्त ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानातून शूरविरांना वंदन करण्यात येत आहे.

नुकत्याच झालेल्या चांद्रयान तीन मध्ये खामगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योगांनी सुट्या भागांची निर्मिती केली, ही गौरवाची बाब आहे. यामुळे उद्योगामध्ये जिल्ह्यात कल्पकता दिसून आली आहे. राज्य शासनाच्या प्रयत्नांनी युवकांनी उद्योग उभारणी करून रोजगार निर्मिती करावी, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.

यावेळी श्री. पाटील यांच्या हस्ते शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेले शशांक देवकर. तनुष्का शिंदे, धनंजय लाड, अर्णव शेळके यांचा सत्कार करण्यात आला. विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक प्राप्त जयंत नाईकनवरे, केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे देशभरातून गुन्हे तपासाला उत्कृष्ट तपास व दोषसिद्धी बद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासपे आणि अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, उत्कृष्ट सेवेसाठी पोलिस पदक प्राप्त स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक मोहम्मद अस्लम शेख यांचा सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजवंदनानंतर मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी उपस्थित स्वातंत्र्य संग्राम सैनिक, माजी सैनिक, अधिकारी, कर्मचारी, नागरिकांशी संवाद साधला.

श्री. पाटील यांनी कारंजा चौकातील भारत मातेचा पुतळा आणि जयस्तंभ चौकातील सुशोभिकरणाचे अनावरण केले.

000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed