▪स्वातंत्र्य सैनिकांचा विशेष सन्मान
▪उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस पदक प्राप्त अधिकारी, गुणवंत विद्यार्थी, राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांचा गौरव
नांदेड (जिमाका), दि. 15 :- भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य शासकीय समारंभात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे स्वातंत्र्य सैनिक तथा माजी आमदार गुरुनाथ कुरुडे, स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे वारस, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, दिलीप कंदकुर्ते, जेष्ठ नागरिक, विद्यार्थी यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जनतेला स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. आपल्या देशाने प्रगतीचे अनेक टप्पे गाठले आहेत. यापुढे ही उत्तरोत्तर आपण प्रगतीचे विविध टप्पे गाठू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याचबरोबर या समारंभास उपस्थित असलेल्या स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या परिवारातील प्रमुख सदस्यांचा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी शाल व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला.
उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस पदक प्राप्त अधिकारी, गुणवंत विद्यार्थी, राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांचा गौरव
ध्वजारोहणाच्या मुख्य समारंभानंतर महामहिम राष्ट्रपती महोदयांनी 2023 साठी उत्कृष्ट सेवेबाबत पोलीस पदकाने सन्मानित होणारे उपविभागीय पोलीस अधिकारी बालकृष्ण हनपुडे पाटील, पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांचा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सत्कार केला. याचबरोबर पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी पूराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तींचा जीव वाचविल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. पोलीस उपनिरीक्षक रहीम बशीर चौधरी यांनी सीसीटीएनएस प्रणालीत नांदेड जिल्ह्याचे काम संपूर्ण महाराष्ट्रात सहा वेळेस प्रथम आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. पूर्व उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रबोध कुलकर्णी यांनी केले.
00000