• Fri. Nov 15th, 2024

    राष्ट्रपती पोलिसपदक, शौर्यपदक विजेत्या पोलिसांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

    ByMH LIVE NEWS

    Aug 14, 2023
    राष्ट्रपती पोलिसपदक, शौर्यपदक विजेत्या पोलिसांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

    मुंबई, दि. 14 :- राष्ट्रपती पोलीस पदक, पोलीस शौर्यपदक, गुणवत्तापूर्ण सेवापदक जाहीर झालेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील 76 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. कायदा-सुव्यवस्था, गुप्तवार्ता, गुन्ह्यांचा तपास, आपत्कालीन परिस्थितीतील मदतकार्य, नागरिकांशी संवाद-सौहार्द अशा अनेक आघाड्यांवर जगातील सर्वोत्कृष्ट पोलिस दलांपैकी असलेल्या महाराष्ट्र पोलिसांनी त्यांची क्षमता, गुणवत्ता, दर्जा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. पदकविजेत्या पोलिसांचा राज्याला अभिमान आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्र्यांनी सर्वांचं कौतुक केलं असून यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. उल्लेखनीय सेवेबद्दल ‘राष्ट्रपती पदक’ विजेत्या प्रवीण साळुंखे, विनयकुमार चौबे आणि जयंत नाईकनवरे या पोलीस अधिकाऱ्यांचेही उपमुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

    भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील 954 पोलिसपदकांची घोषणा केली. राज्यातील 76 पोलिसांना ही पदकं जाहीर झाली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, महाराष्ट्र पोलीसांना शौर्याची, त्यागाची, देशसेवेची, बलिदानाची प्रदीर्घ, गौरवशाली परंपरा आहे. महाराष्ट्र पोलिसांची देशसेवेची ही गौरवशाली परंपरा पुढे नेणाऱ्या राज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेचे ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, 33 अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘पोलीस शौर्यपदक’, तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 40 अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘पोलीस पदक’ जाहीर झाले आहे. पदकविजेत्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्राला अभिमान असून यापुढील काळातही त्यांच्याकडून अशीच देशसेवा घडत राहील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *