• Sun. Sep 22nd, 2024

‘हत्ती बेट’ पर्यटनस्थळ देशाच्या पर्यटन नकाशावर आणणार – क्रीडा मंत्री संजय बनसोडे – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 13, 2023
‘हत्ती बेट’ पर्यटनस्थळ देशाच्या पर्यटन नकाशावर आणणार – क्रीडा मंत्री संजय बनसोडे – महासंवाद

हत्तीबेट ‘ब’ वर्ग पर्यटन स्थळ ‘अ’ वर्ग करण्यासाठी प्रयत्न होणार; हत्ती बेटाच्या धर्तीवर नागराळ बेटाचा विकास करणार

लातूर, दि. 13 (जिमाका) : हत्तीबेटाचा पर्यटन विकास करताना आज तीन कोटी 29 लाख रुपये दिले असले तरी इथून पुढे या पर्यटन स्थळाला राष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी विकास केला जाईल, असे प्रतिपादन क्रीडा, युवक कल्याण आणि बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे यांनी केले.

हत्ती बेट येथील 3 कोटी 29 लाख रूपयाच्या विविध विकास प्रकल्पाचे भूमिपूजन आज श्री. बनसोडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, बसवराज पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ तिरुके, विशेष कार्य अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार रामेश्वर गोरे, उदगीर बाजार समितीचे संचालक प्रा.शाम डावळे, हत्ती बेट विकासाला चालना देणारे ज्येष्ठ पत्रकार व्ही. एस. कुलकर्णी यांच्यासह विविध अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

हत्ती बेट लातूर जिल्ह्यातील पहिले ‘ब’ पर्यटन स्थळ आहे. याचा विकास करताना इथल्या लेण्या पर्यटकांना खुल्या करून देताना वेरूळ – अजिंठा सारखा आपल्याला विकास करायचा आहे. त्यासाठी त्याचा विकास आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाने तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून करावा, अशा सूचना क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या.

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष

हे वर्ष आपण मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्षे म्हणून साजरा करत आहोत. ज्या हत्ती बेटावर आपण आज विविध विकास कामं केली, तिथे किसान दलाने निजामाविरुद्ध युद्ध केलं आहे. रामघाट येथेही लढाई झाली होती. अशा महत्वाच्या पाऊल खुणा जिथे जिथे आहेत, तिथे कायमस्वरूपी त्या घटनांचे स्मरण होण्यासाठी काम करण्याच्या सूचना श्री. बनसोडे यांनी यावेळी दिले.

राज्यात ऑलिम्पिक भवन उभारणार

राज्याचा क्रीडा मंत्री झाल्यानंतर अनेक कामाला गती दिली असून पुण्याच्या बालेवाडीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ उभे राहत आहे. त्या विद्यापीठासाठी क्रीडा क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तीला कुलगुरू म्हणून नियुक्त करणार आहोत. राज्याला पर्यायाने देशाला ऑलिम्पिक सारख्या जगविख्यात स्पर्धेत अधिकाधिक पदक मिळविणारे खेळाडू निर्माण व्हावेत, म्हणून हरियानाप्रमाणे ऑलिम्पिक भवन महाराष्ट्रात उभे करणार असून त्यासाठी 44 कोटी रुपये शासनाने मंजूर केले असल्याची माहिती क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी दिली. तसेच ‘खेलो इंडिया खेलो’ स्पर्धेत महाराष्ट्राला सर्वाधिक पदक मिळाले आहेत. त्यात अजून प्रगती व्हावी म्हणून ‘खेलो इंडिया अकॅडमी’ राज्यात उभी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

लातूर जिल्हा म्हटले की शिक्षण, कृषी या क्षेत्राचा उल्लेख होतो, त्यात कुठेही पर्यटन येत नाही. हत्ती बेटावर आल्यानंतर इथली वन संपदा पाहून खूप प्रसन्न वाटले. लातूर जिल्ह्यातील पर्यटनाची ठिकाणे अधिक गतीने विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी सांगितले. या पर्यटन स्थळाचा विकास करताना देशी वृक्षाचे संगोपन, फुलपाखरू उद्यान, लहान मुलांचे खेळ, धाडसी खेळ, लेण्याचा विकास असा समग्र विचार केला जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली.

हत्ती बेट पर्यटनवाढीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यामातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी यावेळी सांगितले.

हत्ती बेट विकसित करण्यासाठी पत्रकार व्ही.एस. कुलकर्णी यांनी सुरुवाती पासून प्रयत्न केल्याचे सांगून या बेटाला ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाच्या यादीत कसे आणता येईल, याचा प्रयत्न व्हावा असे आवाहन माजी आमदार गोंविंद केंद्रे यांनी केले.

हत्ती बेटाबरोबर नागराळ बेटाचाही विकास करावा. गावकऱ्यांच्या प्रयत्नातून 25 हजारापेक्षा अधिक वृक्ष लागवड केली होती. त्यातले 20 ते 22 हजार वृक्ष आज नागराळ बेटावर जगले असल्याची माहिती बसवराज पाटील यांनी दिली.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ तिरुके, बाजार समितीचे संचालक प्रा. शाम डावळे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. हत्ती बेटाचा सुरुवाती पासूनचा विकासाचा प्रवास पत्रकार व्ही. एस. कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकात मांडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन धनंजय गुडसूरकर यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते वडाच्या झाडाच्या रोपाची लागवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed