• Tue. Nov 26th, 2024

    घरात बालमृत्यु झाल्यास परिसरातील संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

    ByMH LIVE NEWS

    Aug 11, 2023
    घरात बालमृत्यु झाल्यास परिसरातील संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

    नंदुरबार  दिनांक ११ ऑगस्ट २०२३ (जिमाका वृत्त) : जिल्ह्यातील गरोदर माता आणि बालमृत्युचे प्रमाण रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जात असून घरात बालमृत्यु झाल्यास त्या परिसरातील संबंधित यंत्रणेच्या अधिकारी,कर्मचारी यांच्यावर कारवाई करणार असल्याचे संकेत राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आज दिले आहेत.

    जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची आढावा बैठक जिल्हा परिषदेमध्ये संप्पन झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेच्य अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मंदार पत्की, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी  रविंद्र सोनवणे,  ज्येष्ठ समाजसेवी डॉ कांतीलाल टाटीया, लतिका राजपुत, चेतन साळवे ,तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

    ते पुढे म्हणाले, आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी दुर्गम भागात नियमित जात नसल्याने कुपोषित बालक, गरोदर मातांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळत नाहीत. ते  वेळेवर दवाखान्यात पोहचू शकत नाही. जर आरोग्य यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी वेळेवर पोहचले तर कुपोषित बालके आणि गरोदर महिलांना चांगल्या सुविधा देण्याबरोबरच उपचारासाठी देखील तात्काळ रुग्णालयात दाखल करता येईल, असे मत यावेळी मंत्री डॉ विजयकुमार  गावितांनी व्यक्त केले.

    जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाड्या-पाड्यापर्यंत आरोग्य सुविधा देण्यासाठी येत्या काही महिन्यात बारमाही रस्त्यांची बांधणी देखील केली जात आहे. तर दुर्गम अतिदुर्गम भागातील विद्युतीकरणाच प्रश्न मार्गी लावण्यासाठी देखील कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. गरज भासल्यास गुजरात, मध्यप्रदेश सरकारच्या सामंजस्यआने अतिदुर्गम भागात विद्युत पुरवठा करुन हा प्रश्न देखील मार्गी लावण्यात येईल,असेही यावेळी मंत्री डॉ विजयकुमार गावित म्हणाले. वैद्यकीय महाविद्यालयास डॉक्टर्स आणि कर्मचारी वर्ग उपलब्ध झाल्यानंतर धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात एक वार ठरवुन त्यांच्या मार्फत देखील आरोग्य सुविधा पुरविण्याचा मानस यावेळी त्यांन व्यक्त केला. यावेळी आरोग्याशी संबंधीत सर्व समस्या त्यांनी यंत्रणेकडून जाणून घेत राज्य तसेच जिल्हा स्तरावर याचे लवकरच निराकरण करुन दुर्गम भागातील आरोग्य यंत्रणेचे देखील बळकटीकरण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

    ते म्हणाले, रस्त्यांची निर्मीती होईपर्यंत बांबुची झोळी करुन रुग्णांना दवाखान्या पर्यंत नेणाऱ्यांना  काही अनुदान  किंवा मानधन देका येईल का व  तालुका स्तरावर शववाहीक बाबत शासन स्तरावरुन तात्काळ निर्णय घेवून सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र आरोग्य यंत्रणेने सजग राहून जिल्ह्यातील आरोग्य समस्या मार्गी लावण्याची  गरज मंत्री डॉ गावितांनी यावेळी बोलताना आवर्जून अधोरेखित केली.

    यावेळी झालेल्या चर्चेत, जिल्हा परिषदेच्य अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मंदार पत्की, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी  रविंद्र सोनवणे,  ज्येष्ठ समाजसेवी डॉ कांतीलाल टाटीया, लतिका राजपुत, चेतन साळवे यांनी सहभाग घेतला.

     

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed