टोमॅटो चोरीची घटना घडलीच नव्हती. फक्त प्रसिद्धीसाठी शेतकऱ्याने सर्वांना भलतेच कामाला लावले. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी शेतकऱ्याला समज दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतातील ८०-९० क्रेट टोमॅटो रात्री चोरीला गेल्याचे गावातील प्रमुखांच्या कानावर बालाजी भोसले यांनी घातले होते. अन् सजग नागरिकांच्या एका फोनवर पोलीस थेट टोमॅटोच्या शेतात पोहोचले. जमलेल्या अनेक शेतकऱ्यांसह शेतात कोनाकोपरा धुंडाळल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांना संशय आला. त्यानंतर चोरीच झाली नाही या निष्कर्षावर पोलीस पोहोचले.
उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी येथील बालाजी गजेंद्र भोसले यांची वडाळा-पडसाळी रस्त्यालगत शेती आहे. ऐन उन्हाळ्यात २० मे रोजी या भोसले कुटुंबाने टोमॅटो लावले. आता टोमॅटो लाल होण्यास सुरुवात झाली असून आठवडाभरात तोडणी करावी लागेल, असे सांगण्यात आले. मात्र बुधवारी सकाळी बालाजी भोसले यांनी रात्री ८० ते ९० क्रेट टोमॅटो चोरीला गेल्याचे गावातील काहींना सांगितले. हा हा म्हणता संपूर्ण गावातच टोमॅटो चोरीची बातमी पसरली. कारण सोन्याचा भाव टोमॅटोला असल्याने बालाजी भोसले यांना टोमॅटोचे भरपूर पैसे मिळणार ही चर्चा अगोदर होतीच.
नाना शिरसट, लंकेश्वर पाटील यांनी पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांना टोमॅटो चोरीची घटना सांगितली. गावकरी गावातून टोमॅटोच्या शेतात जाईपर्यंत पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर आणि त्यांची टीम टोमॅटो शेतात पोहोचली. शेतकरी आणि पोलीस टोमॅटो शेतीच्या कोनाकोपऱ्यात फिरले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर हे चोरी झाली नसावी? या निष्कर्षावर पोहोचले. पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी माहिती देताना सांगितले की, शेतकऱ्याने फक्त प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी केली आहे. यानंतर त्याला समज देऊन सोडण्यात आले.