‘सीएसएमटी’हून सकाळी ४.१९ वाजल्यापासून लोकल वाहतूक सुरू होते. पहिली कसारा ४.१९ वाजता आणि पहिली खोपोली लोकल ४.२४ वाजता रवाना होते. पहिली जलद लोकल कल्याणसाठी ५.२० वाजता धावते. मात्र, ही वातानुकूलित लोकल असल्याने साध्या जलद लोकलसाठी सर्वसामान्यांना ५.४६ च्या कर्जत जलद लोकलची वाट पाहावी लागते. यामुळे लोकल सुरू झाल्यानंतर तब्बल दीड तास प्रवाशांना जलद लोकलसाठी फलाटावर वाट बघत उभे रहावे लागत होते.
पहाटे ४.२४ ची सीएसएमटी ते खोपोली धीमी लोकल आता ४.३५ वाजता जलद लोकल म्हणून चालवण्यात येणार आहे. ही लोकल भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण या स्थानकावर थांबेल. कल्याण ते खोपोलीदरम्यान सर्व स्थानकावर लोकल थांबणार आहे. जलद लोकलमुळे प्रवासात ११ मिनिटांची बचत होणार आहे. ‘सीएसएमटी’हून सुटणाऱ्या पहिल्या धीम्या अर्थात कसारा लोकलच्या वेळेत कोणताही बदल नाही. गुरुवार, १० ऑगस्टपासून हे बदल लागू होतील, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितले.
सध्या सीएसएमटी ते खोपोलीदरम्यान १३ जलद, सीएसएमटी ते कर्जतदरम्यान ४१, सीएसएमटी ते कल्याणदरम्यान ३७ सीएसएमटी ते कसारादरम्यान २७ आणि सीएसएमटी ते ठाणेदरम्यान १५ अशा जलद लोकल धावतात. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर एकूण फेऱ्यांची संख्या ८९४ आहे. यात २७० जलद लोकल असून, ६२४ धीम्या फेऱ्या आहेत. गुरुवारपासून २७१ जलद आणि ६२३ धीम्या लोकल फेऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहेत.
वेळापत्रक
सीएसएमटी – ४.३५
भायखळा – ४.४२
दादर -४.४८
कुर्ला -४.५७
घाटकोपर – ५.०२
ठाणे – ५.२०
डोंबिवली – ५.३७
कल्याण – ५.५१
कल्याण ते खोपोली – सर्व स्थानकांवर थांबा