रविवारी सायंकाळच्या सुमारास अचानक यवतेश्वर घाटामध्ये मोठी दरड कोसळल्याने यवतेश्वरवरून कासकडे जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गेल्या काही दिवसांपूर्वीच यवतेश्वर घाटामध्ये अनेक दरडी कोसळत होत्या. त्यामुळे धोकादायक झालेल्या दरडीचे दगड सातारा बांधकाम विभागाच्या माध्यमातून काढण्यात आल्या होत्या. मात्र आज पुन्हा एकदा धोकादायक दरडी आता निसटू लागल्याने यवतेश्वर घाटामध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्याचा धोका निर्माण झाला आहे.
बांधकाम विभागाने पुन्हा एकदा घाटातील परिसराचा सर्वे करून धोकादायक असलेल्या दरडी हटवाव्यात, अशी मागणी आता नागरिक आणि पर्यटकांकडून होऊ लागली आहे. धोकादायक दरड पाडण्यासाठी मागील आठवड्यात यवतेश्वर घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे २४ तास बंद ठेवला होता. तसेच घाटाच्या पायथ्याशी असलेल्या महादरे आणि मोरे कॉलनी परिसरही पूर्णपणे बंद ठेवला होता. बांधकाम विभागाने सोमवारी सकाळी सांबरवाडीच्या बाजूने पोकलेन चढवून कड्यावरील महाकाय दगड काही प्रयत्नानंतर दरीत ढकलून दिला.
ही कार्यवाही दोन पोकलेन आणि महसूल विभागाच्या २० कर्मचाऱ्यांनी केली. महसूल, बांधकाम विभागाच्या पथकाने नियंत्रण ठेवून काम पाहिले. तरी अद्यापही या घाटात अधूनमधून दरडी कोसळत असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच अनर्थ घडण्याची मोठी शक्यता आहे. सायंकाळी घडलेल्या घटनेनंतर या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे दरड हटवण्याचे काम अद्याप झालेले नाही. आज रविवार असल्यामुळे कासला जाणाऱ्या पर्यटक संख्या जास्त होती. सायंकाळी ही घटना घडल्यानंतर वाहतूकही विस्कळीत झाली होती.