• Sat. Sep 21st, 2024
आयुष्यभर साथ दिली, अखेरच्या क्षणी तिचा हातही हातात घेता आला नाही, २ दिवस मृतदेहाशेजारी राहिले

बोरिवली, मुंबई : बायकोने नवऱ्यासमोर जीव सोडला पण हतबल नवरा काहीच करू शकला नाही. मृतदेहाचा वास यायला लागला. शेजारच्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी फ्लॅटचं दार तोडलं अन् त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहायला लागल्या. ही हृदयद्रावक घटना आहे मुंबईतल्या बोरिवलीची…

बोरिवलीच्या राजेंद्रनगरमधल्या भूमी गार्डन इमारतीत भास्कर शेट्टी आणि सुलोचना शेट्टी गेल्या अनेक वर्षांपासून राहायला आहेत. त्यांची लेक आणि जावई नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत असतात. वृद्ध आईवडिलांसाठी त्यांनी ‘केअर टेकर’ ठेवला होता. पण तो व्यवस्थित काम करत नसल्याने त्याला काही दिवसांपूर्वी त्यांनी कामावरून काढून टाकलं होतं. दरम्यानच्या दिवसांत सुचोलनाबाई आजारी पडल्या. अगदी काही दिवस अंथरूणाला खिळून होत्या.

पावसामुळे सुचोलनाबाई फ्लॅटबाहेर येत नसाव्यात, असा शेजारच्यांचा समज झाला. काही दिवस गेल्यानंतर सुचोलनाबाईंच्या फ्लॅटमधून उग्र वास यायला लागला. शेजारच्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ सुलोचनाबाईंचं घर गाठलं. दरवाजा बंद होता. बेल वाजवूनही दार उघडत नसल्याने त्यांनी फ्लॅटचं दार तोडलं.

पुण्यात डोळ्यांची साथ, रुग्णांची संख्या वाढली, शहरात ‘ड्रॉप’ही मिळेना, असे करा घरगुती उपचार….
पोलिसांच्याही काळजाचं पाणी पाणी…

पोलिसांनी दार तोडून आतमध्ये प्रवेश केल्यावर समोरचं चित्र पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. त्यांच्या काळजाचं पाणी पाणी झालं. कायम अंथरुणाला खिळून असलेले ऐंशी वर्षीय भास्कर शेट्टी… आपल्या शेजारीच पत्नीचा मृतदेह पडलेला असताना त्या संवेदनाही त्यांना कळल्या नाहीत. बायको हृदयविकाराच्या धक्क्याने गतप्राण पडून दोन दिवस उलटल्यानंतरही हतबल भास्करराव काहीच करू शकले नाहीत…

चालत्या फिरत्या घर सांभाळणाऱ्या, सोसायटीत सगळ्यांशी आपुलकीचे संबंध ठेवणाऱ्या ७८ वर्षीय सुलोचना शेट्टी. नवरात्र असो की गणपती, सोसायटीच्या कार्यक्रमात त्या हिरहिरीने भाग घ्यायच्या. आपल्या आजारी ८० वर्षीय नवऱ्याची अतिशय आपुलकीने त्या काळजी घ्यायच्या.

धोंड्याचं जेवायला जावईबापूंची लगबग, पण नगरच्या या गावात नेमकी प्रथा उलटी, कारण काय? वाचा…
मुंबईत ज्येष्ठ नागरिकांना जी काही मदत लागेल ते देण्याचे काम पोलिस करतात. दर सात दिवसांनी ते एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरी भेट देतात. काही दिवसांपूर्वी कस्तुरबा पोलीस ठाण्याचे कर्मचारी शेट्टी यांच्या घरी जाऊन आले होते, त्यावेळी दोघांचीही तब्येत व्यवस्थित होती.

शेजारचे ढसाढसा रडले

ज्यावेळी सुलोचनाबाईंच्या मृत्यूची बातमी कळली तेव्हा त्यांच्या शेजारी राहणाऱ्या रेश्मा नांदीवडेकर यांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्या हमसून हमसून रडल्या. सोमवारी आमची अखेरची भेट झाली होती. ती भेट शेवटची असेल असं मला वाटलं नव्हतं, पावसाळ्यामुळे त्या घराबाहेर निघत नसाव्यात, असा माझा कयास होता. आम्ही गेली २० वर्ष एकमेकींना ओळखायचो, एकमेकींच्या सुख दु:खात सामील व्हायचो, पण नियतीच्या क्रूर खेळासमोर कुणाचं काय चालतंय… असं म्हणत असताना त्यांना डोळ्यातलं पाणी आवरता येत नव्हतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed