व्हिडीओची चौकशी केली असता, हॉटेल सह्याद्री परमीट रुम व बियर बारमधील हा दीड वर्षापूर्वीचा हा व्हिडीओ असून नृत्य करणारे हे काही पोलीस तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी तर एक कर्मचारी हा स्थानिक गुन्हे शाखेचा कर्मचारी आहे. तर व्हिडिओत दिसणाऱ्यांपैकी एक ते दोन जण हे पोलीस कर्मचाऱ्यांच्या ओळखीचे खाजगी व्यक्ती असल्याची माहिती आहे. एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने गेट टुगेदरच्या नावाने पार्टीचं जळगाव शहरातील हॉटेल सह्याद्री परमिट रूम बियर बार या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. याच हॉटेलात रात्रीच्या वेळी मद्यप्राशन तसेच जेवणानंतर केल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत पोलिसांनी याच हॉटेलात टिमकी वाजवणाऱ्या वादकाला बोलावून घेत टिमकीच्या तालावर, पोलीस कर्मचारी एकमेकांच्या अंगावरून पैशाची ओवाळणी करत वादकाला पैसे देत असल्याचेही व्हिडिओत दिसून येत आहे. कर्मचारी नृत्य करत असल्याच्या काही अंतरावर टेबल असून त्या टेबलवर मद्याच्या बाटल्या सुध्दा दिसून येत आहे.
नृत्य करणाऱ्यांमधील एक पोलीस कर्मचारी दोन दिवसांपूर्वीच अवैध वाळू व्यवसायातील सहभागामुळे निलंबित
या व्हिडिओमध्ये नृत्य करताना दिसून येणारा एका पोलीस कर्मचाऱ्याचे नाव विश्वनाथ गायकवाड आहे तो तालुका पोलीस स्टेशनचा कर्मचारी आहे. या गायकवाड नावाच्या कर्मचाऱ्याला दोन दिवसापूर्वीच अवैध वाळू व्यवसायात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी निलंबित केला आहे. या विश्वनाथ गायकवाड नावाच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडून विभागीय चौकशी सुरु झाली आहे. तर दुसरीकडे तालुका पोलीस ठाण्याचे परिक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार यांच्यामार्फत खात्यामार्फत चौकशी सुरु आहे. हा कर्मचारी गायकवाड याने दुसऱ्याच्या नावावर ट्रॅक्टर करत स्वत: वाळूचा ठेका चालवित असल्याची माहिती मिळाल्यावर आप्पासाहेब पवार यांनीच कारवाई करत हा ठेका जप्त केला आहे. आता निलंबित केलेल्या या विश्वनाथ गायकवाड नावाच्या कर्मचाऱ्यांच्या पुन्हा आता नवीन एक हा कारनामा समोर आला आहे.
बनावट देशी विदेशी दारुप्रकरणात कारवाई अन् गुन्हा दाखल झालेल्या संशयितासोबत पोलिसांचे नृत्य
जळगावात सहा ते सात वर्षांपूर्वी ५० ते ६० लाख रुपयांचा बनावट देशी-विदेशी दारुचा मोठा साठा जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी त्यांच्या पथकासह पकडून गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत विनोद देशमुख उर्फ (बापू वाणी) हा मुख्य आरोपी असल्याचं निष्पन्न झालं होतं. ज्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता, त्याच पोलीस ठाण्याचे कर्मचारी या संशयितासोबत पोलिस गेट टुगेदर पार्टीच्या नावाखाली टीमकी वाजून जोरदार आरडाओरडा करत नाचत असल्याच्या व्हायरल व्हिडीओमुळे, पोलीसच जर संशयितांसोबत मद्यप्राशन पार्टी अन् नृत्य करत असतील नागरिकांनी विश्वास ठेवायचा कोणावर? अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
विधानसभेच्या अधिवेशनात असो की पत्रकार परिषदेत अनेकदा एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्हा पोलीस दलातील पोलिसांवर अवैध दारु, वाळू, सट्टा पत्ता या अवैध धंद्यामध्ये हप्ते खोरीसह अनेक गंभीर आरोप केल्याचे पाहायला मिळालं. यामुळे पोलिसांचा धाकच राहिला नाही असंही वेळोवेळी एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलं. पोलिसांचा नृत्याचा हा व्हिडीओ आणि अवैध वाळू व्यवसायात पोलीस कर्मचाऱ्यांचा असलेला सहभाग या दोन्ही गोष्टींवरून एकनाथ खडसेंनी यांनी केलेल्या आरोपांवर शिक्कामोर्तब झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
पोलीस अधीक्षकांचे दुर्लक्ष
पोलीस कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत नृत्य करत आहे, या गंभीर प्रकारबाबत पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांची फोनवरुन प्रतिक्रिया जाणून घेतली असता, आम्ही तर आमच्या पध्दतीने काय कारवाई करायची ते करु. पण तुम्हाला जुना विषय सर्व माहिती आहे, दोन दिवसांपूर्वी एका कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली, आणि त्याचाच दीड वर्षापूर्वीचा व्हिडीओ आत्ताच कसा व्हायरल झाला, या गोष्टींबद्दलही तुम्ही माहिती घेऊन तसंही लिहा, असे प्रतिसवाल पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी केले. दरम्यान या प्रकाराची चौकशी सुरु करण्यात आली, व्हिडीओ कधीचा, पोलिसांनी मद्यप्राशन केले का, पोलीस संशयितासोबत नृत्य करताहेत, पार्टीच काय निमित्तं होतं, या सर्व प्रश्नांची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.