• Sat. Sep 21st, 2024

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य संग्रहालय उभारणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

ByMH LIVE NEWS

Aug 5, 2023
मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य संग्रहालय उभारणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

पुणे, दि.५: महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरे करण्यात येत असून यानिमित्ताने मुंबई येथे ३० एकर जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य संग्रहालय उभारण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

नऱ्हे येथील शिवसृष्टीला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. श्री.मुनगंटीवार म्हणाले, शिवसंग्रहालय भव्यदिव्य आणि अत्याधुनिक संकल्पनेवर आधारित व्हावे, त्यातून शिवरायांचे संपूर्ण जीवन जगासमोर ठेवले जावे अशा सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत. मुंबईत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांपर्यंतही महाराजांचे कार्य यानिमित्ताने पोहोचेल. महाराजांच्या जीवनाशी निगडित ८८ हजार वस्तू राज्यात विविध ठिकाणी आहेत, त्या एकाच ठिकाणी आणण्याचाही प्रयत्न संग्रहालयाच्या निमित्ताने होणार आहे.

शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षाच्या निमित्ताने प्रत्येकाच्या हृदयात शिवाजी महाराज प्रतिबिंबित व्हावे आणि त्यांच्या विचारावर आधारित कृती करण्याची ऊर्जा नागरिकांना मिळावी यासाठी हे आयोजन आहे.  यानिमित्ताने सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणेच्या (पीएएस) माध्यमातून दररोज ९.४५ वाजता मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत दिनविशेष आणि त्यांचे विचार प्रसारित करण्यात येणार आहेत.

शिवरायांच्या इतिहासाशी संबंधित १२ टपाल तिकिटे प्रकाशित करण्यात येणार आहेत. येत्या ९ ऑगस्टला शहाजी महाराजांवर आधारित टपाल तिकीट प्रकाशित करण्यात येईल. रिझर्व बँकेच्या माध्यमातून सोने, चांदी आणि तांब्याची ‘होन’ मुद्रा  तयार करण्यात येईल. छत्रपतींची वाघनखे देण्याची विनंती ब्रिटिश म्युझिअमने मान्य केली आहे, जगदंबा तलवारही परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपट महोत्सवाचेही आयोजन करण्यात येईल, अशी माहिती श्री.मुनगंटीवार यांनी दिली.

शिवसृष्टीला भेट देण्याचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवून त्याचे संस्कारक्षम व्यक्तिमत्व घडविण्यासाठी शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना शिवसृष्टीला भेट देण्यासाठी आणावे आणि या शिवकार्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, एकविसाव्या शतकात वैचारिक प्रदूषणाचा धोका वाढला असताना आदर्श जीवनासाठी मार्गदर्शन करणारा शिवरायांचा विचार समाजासमोर मांडणे गरजेचे आहे. हे कार्य शिवसृष्टीच्या माध्यमातून होत आहे. उत्तम समाज घडविण्याचा हा प्रयत्न आहे. विद्यार्थी ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आत्मसात करीत असताना त्याला संस्काराचा विचार देणे तेवढेच महत्त्वाचे आहे. शिवरायांच्या विचारावर आधारित समाज घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना शिवसृष्टीला भेट देण्यासाठी आवर्जून आणावे, असे आवाहन त्यांनी केले.

श्री.मुनगंटीवार यांनी संस्था चालकांशी संवाद साधला आणि विविध संस्थांनी राबविलेल्या उपक्रमांची माहिती घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed