पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जा प्रकल्पावर राबविण्यास प्राधान्य देणार
– पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई, दि. ३ : पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जा प्रकल्पावर राबविण्यासाठी शासनाला शक्य आहे, तिथे प्राधान्याने मार्गदर्शक तत्त्वानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे उत्तर पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानपरिषदेत दिले.
सदस्य रणजितसिंह मोहिते – पाटील यांनी जलजीवन मिशनअंतर्गत सोलापूर जिल्ह्याला दिलेले ७५ हजार नळ जोडण्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत तसेच राज्यात सौर ऊर्जेवर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. पाटील बोलत होते.
मंत्री श्री.पाटील म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ५ लाख ७६ हजार ०७८ नळजोडण्या देण्याचे उद्दिष्ट होते. सन २०२३ अखेर प्रगतिपथावरील ८५५ पाणीपुरवठा योजनांमधील नळजोडण्या देऊन उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन आहे. जलजीवन मिशन अंतर्गत २४ नळयोजना सौर ऊर्जा प्रकल्पावर कार्यरत आहेत. नव्याने अशी काही मागणी आल्यास त्याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य गोपीचंद पडळकर, नरेंद्र दराडे, महादेव जानकर यांनी सहभाग घेतला.
०००
संध्या गरवारे/विसंअ/
मानसिक आरोग्य कार्यक्रमाची प्रभावी
अंमलबजावणी – आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत
मानसिक आरोग्य कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाच्या माध्यमातून रुग्णांना आरोग्यसेवा देण्यात येतात. तसेच या रुग्णांसाठी १० खाटा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. राज्यातील मनोविकृती विशेषज्ञांची रिक्त पद भरतीची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी विधानपरिषदेत दिली.
राज्यातील मनोरुग्णालयातील रिक्त पदे भरण्याबाबत सदस्य श्रीकांत भारतीय यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना आरोग्य मंत्री डॉ. सावंत बोलत होते.
मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, मानसिक आरोग्य कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व तांत्रिक मार्गदर्शनासाठी विविध योजना राबविण्यात येतात. प्रादेशिक रुग्णालय, पुणे येथे २ हजार ५४० खाटांचे रुग्णालय आहे. ठाणे येथे १८५० खाटांचे रुग्णालय आहे नागपूर येथे. ९४० खाटांचे रुग्णालय आहे. रत्नागिरी येथे 365 खाटांचे रुग्णालय आहे. कोल्हापूर आणि जालना येथे ३६५ खाटांचे रुग्णालयाची कार्यवाही सुरू आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांतील जिल्हा रुग्णालयांमध्ये मानसिक आरोग्य कार्यक्रमाद्वारे रुग्णांना आरोग्य सेवा देण्यात येते. राज्यात मनोविकृतीशास्त्र विभाग आहे. यामध्ये 14 वैद्यकीय रुग्णालये आहेत. त्यांच्या माध्यमातून ही सेवा देण्यात येत आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी प्रेरणा प्रकल्प राबविण्यात येत आहे. मनशक्ती क्लिनिकदेखील सुरू करण्यात आलेले आहेत. १४७० प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत मानसिक आरोग्याबाबत सेवा देण्यात येतात. ‘टेलिमानस’ हा उपक्रम देखील राबविण्यात येत आहे. व्यसनमुक्ती केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे, असेही मंत्री डॉ.सावंत यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अॅड. अनिल परब, निरंजन डावखरे, अभिजीत वंजारी, सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.
****
संध्या गरवारे/विसंअ/