• Sun. Sep 22nd, 2024

मुंबई येथे मनोरा आमदार निवास बांधकामाचा शुभारंभ

ByMH LIVE NEWS

Aug 3, 2023
मुंबई येथे मनोरा आमदार निवास बांधकामाचा शुभारंभ

मुंबई, दि. ३ : मुंबईतील नरिमन पॉइंट येथे मनोरा आमदार निवास इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

या बांधकाम शुभारंभ आणि भूमिपूजनप्रसंगी विधानपरिषद उपाध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, कृषी मंत्री धनंजय मुंडे, कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती होती. भूमिपूजन आणि शुभारंभ झाल्यानंतर कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.

मनोरा आमदार निवासाच्या १३४२९.१७ चौ.मी. भूखंड क्षेत्र असलेल्या या जागेवर ५.४ एफ.एस.आय. (FSI) च्या अनुषंगाने ७२१५६.०६ चौ.मी. प्रस्तावित प्रत्यक्ष बांधकाम आहे. आधुनिक स्थापत्यशैलीनुसार काळाच्या गरजा आणि वास्तूकलेचा वारसा यांचा संगम साधणाऱ्या मनोरा आमदार निवासाच्या ४० मजली व २८ मजली अशा दोन भव्य इमारती उभारण्यात येणार आहेत.

असे असेल नवीन आमदार निवास :

या नवीन मनोरा आमदार निवासामध्ये आवश्यक त्या सर्व सुविधांनी परिपूर्ण अशी एकूण ३६८ निवासस्थाने सदस्यांसाठी प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यामुळे विधिमंडळाच्या सर्व सदस्यांची एकाच ठिकाणी राहण्याची व्यवस्था होणार आहे. या इमारतीमधील प्रत्येक कक्षाचे क्षेत्रफळ साधारणतः १००० चौ. फूट असेल. या दोन्ही इमारतींमध्ये ८०९ वाहने एकाचवेळी पार्क करता येतील अशा पद्धतीचे पोडियम वाहनतळ असेल. या ठिकाणी विविध स्तरावर स्वयंपाकगृहे, बहुपयोगी हॉल, प्रत्येक मजल्यावर सभागृह, अतिथी कक्ष, व्यायामशाळा, उपाहारगृह, व्यावसायिक केंद्र, पुस्तकालय, ग्रंथालय, सांकृतिक केंद्र, छोटे नाट्यगृह अशा अत्याधुनिक सुविधा असणार आहेत.

०००

संजय ओरके/ससं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed