डॉ. कुरुलकरची पॉलिग्राफ चाचणी आणि व्हाइस लेयर ॲनालिसिस चाचणी करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी पुणे ‘एटीएस’ने न्यायालयात केली होती. त्यावर बुधवारी सुनावणी झाली. ‘एटीएस’ने मागणी केलेल्या दोन्ही चाचण्यांना कुरुलकरने नकार दिला आहे. ‘कुरुलकरच्या पॉलिग्राफ चाचणीसाठी परवानगीची आवश्यकता आहे. तर, व्हाइसलेयर ॲनालिसिस चाचणीसाठी आरोपीच्या परवानगी गरजेची नसते, असे विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी नमूद केले.
तर, ‘एटीएसने न्यायालयात आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे आता व्हॉइस लेयर ॲनालिसिस चाचणीची आवश्यकता नाही,’ असे बचाव पक्षाचे वकील ॠषीकेश गानू यांनी न्यायालयात सांगितले. दरम्यान, कुरुलकरने समाज माध्यमातून दिलेली माहिती ‘पब्लिक डोमेन’मध्ये उपलब्ध आहे. ती माहिती यापूर्वी विविध वेबसाइट, मुलाखती किंवा वृत्तपत्रातील लेखांमधून प्रसिद्ध झाली आहे. कुरुलकर विरोधात आरोपपत्रदेखील दाखल झाले आहे. त्यामुळे तुरुंगातून बाहेर येऊन कुरुलकर तांत्रिक पुराव्यांमध्ये फेरफार करेल अशी शक्यता नाही. या निकषांवर आम्ही जामीन अर्जदाखल केला आहे, अशी माहिती ॲड. ऋषीकेश गानू यांनी दिली.
जामीन अर्जावर नऊ ऑगस्टला युक्तिवाद
प्रदीप कुरुलकर याने वकिलांमार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर येत्या नऊ ऑगस्ट रोजी सरकारी वकील आणि तपास अधिकारी लेखी युक्तिवाद करणार आहेत. त्यानंतर जामीनावर सुनावणी होईल.