मुंबई, दि. 1 : ‘हाफकिन’ ही नावाजलेली संस्था आहे. या संस्थेचे काम मोठे आहे. देशातून पोलिओ हद्दपार करण्यासाठी हाफकिनची संशोधित लस जगात कौतुकास पात्र ठरली आहे. लस संशोधनातील हाफकिनचे काम मोलाचे आहे, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले.
हाफकीन औषध निर्माण महामंडळ येथे मंत्री श्री. आत्राम यांनी आज भेट दिली. त्यावेळी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आयुक्त अभिमन्यू काळे, हाफकिन महामंडळाचे महाव्यवस्थापक श्री. शंकरवार, खरेदी कक्षाचे डॉ शिंगारे आदी उपस्थित होते.
अडचणींवर मात करीत हाफकीन संस्थेचे कार्य सुरू असल्याचे सांगत मंत्री श्री. आत्राम म्हणाले की, संस्थेसाठी जे चांगले करता येईल, ते करण्याचा प्रयत्न राहणार आहे. संस्थेच्या बळकटीणासाठी प्रयत्न केले जातील. उद्भवलेल्या अडचणींवर मार्ग शोधून पुढे जाण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. बैठकीनंतर मंत्री श्री. आत्राम यांनी हाफकिन औषध निर्माण महामंडळाच्या कफ सिरप उत्पादनाचे पॅकेजिंग व निर्मिती प्रकल्पाची पाहणी केली.
हाफकिन औषध निर्माण महामंडळ भेटीनंतर हाफकीन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग रिसर्च ॲण्ड टेस्टिंग संस्थेलाही मंत्री श्री. आत्राम यांनी भेट दिली. यावेळी हाफकिन संग्रहालयाची पाहणी त्यांनी केली. पाहणीनंतर या संस्थेविषयी सादरीकरणातून माहिती घेतली. यावेळी संस्थेच्या संचालक सीमा व्यास, मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री. रामटेके उपस्थित होते.
००००
निलेश तायडे/विसंअ/