• Mon. Nov 25th, 2024

    मुंबईकरांनो काळजी घ्या! राज्यात डोळ्यांची साथ आलीय, बीएमसीकडून मार्गदर्शक सूचना जाहीर

    मुंबईकरांनो काळजी घ्या! राज्यात डोळ्यांची साथ आलीय, बीएमसीकडून मार्गदर्शक सूचना जाहीर

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून डोळे येण्याचे रुग्ण वाढले आहेत. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेने सर्व सरकारी आणि खासगी दवाखान्यांना सतर्क केले आहे. महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग या रुग्णसंख्या वाढीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगितले आहे.

    मुंबईमध्ये डोळे येण्याच्या संसर्गामध्ये अद्याप लक्षणीय वाढ झालेली नाही. मात्र सध्या मुंबईत पाऊस सुरू असल्याने हवेतील आर्द्रता वाढून डोळे येण्याची विषाणूजन्य साथ पसरू शकते. ही साथ अत्यंत सांसर्गिक आहे. तिचा प्रसार रोखण्यासाठी डोळ्यांची योग्य निगा राखणे आवश्यक आहे. तसेच मुंबईमध्ये डोळे येण्याची साथ पसरू नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने आरोग्यविषयक काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

    डोळे येण्याची साथ पसरू नये यासाठी ज्या परिसरात अधिक रुग्ण आहेत, तेथे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचारी घरोघरी भेटी देऊन सर्वेक्षण करत आहे. याबाबत जनजागृती करून आवश्यक माहिती दिली जात आहे. सर्व आरोग्य संस्थांमध्ये या आजाराच्या उपचारासाठी लागणारी आवश्यक औषधे उपलब्ध केली आहेत, अशी माहिती डॉ. दक्षा शहा यांनी दिली आहे.

    संसर्गाची लक्षणे

    डोळ्यांचा विषाणू संसर्ग हा मुख्यत्वे अ‍ॅडिनो व्हायरसमुळे होतो.
    डोळ्यांना खाज सुटणे, डोळे लाल होणे, पापण्या सुजणे आणि संसर्ग झालेल्या डोळ्यांतून पांढरा स्त्राव येणे, यांचा लक्षणांमध्ये समावेश होतो.

    नागरिकांना आवाहन

    – पावसामुळे माशा किंवा चिलटांचा प्रादुर्भाव असेल तर तो परिसर स्वच्छ ठेवावा.
    – ज्या व्यक्तीला डोळे आले असतील त्याने सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे
    – डोळ्याला वारंवार हात लावू नये, तसेच नियमित हात धुणे आवश्यक आहे.
    – एकापासून दुसऱ्या व्यक्तीला हा संसर्ग वेगाने होतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे आवश्यक आहे.
    – कपडे, टॉवेल आणि चादरी स्वतंत्र ठेवाव्यात, जेणेकरून रोगाचा प्रसार कुटुंबातील इतर सदस्यांना होणार नाही.
    – शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लक्षणे आढळल्यास त्यांना शाळेत पाठवू नये.
    – डोळ्याचा हा संसर्ग सौम्य स्वरूपाचा असला तरी आजाराची लक्षणे आढळल्यास जवळच्या सरकारी रुग्णालयात, दवाखान्यात,आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय सल्ला व उपचार घ्यावा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed