• Sun. Sep 22nd, 2024

शासकीय मदतीपासून एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jul 30, 2023
शासकीय मदतीपासून एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे – महासंवाद

▪️ जळकोट तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

▪️ घरांची पडझड झालेल्या नुकसानग्रस्तांना मदतीचे धनादेश वितरित

▪️ अतिवृष्टीने झालेल्या प्रत्येक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना

▪️ मरसांगवी येथे बॅरेज उभारणीसाठी प्रयत्न करणार

लातूर, दि. ३० (जिमाका) : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला जळकोट तालुक्यातील एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. शासनाने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार एन डी आर एफ निकषापेक्षा जास्त दराने ही मदत देण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

जळकोट तालुक्यातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर रावणकोळा येथे शेतकरी, ग्रामस्थांशी संवाद साधताना श्री. बनसोडे बोलत होते. सरपंच सत्यवान पाटील, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार सुरेखा स्वामी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रक्षा शिंदे यांच्यासह विविध विभागांचे तालुकास्तरीय प्रमुख यावेळी उपस्थित होते.

जळकोट तालुक्यातील घोणसी मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, घरे, रस्त्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार ७८० शेतकऱ्यांच्या जवळपास तीनशे हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. तसेच घरांची पडझड, जनावरे वाहून जावून, घरात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानग्रस्तांना शासकिय मदत लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येईल, असे श्री . बनसोडे यांनी सांगितले. तसेच अजूनही कोणत्या नुकसानीचे पंचनामे राहिले असल्यास ते तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

मरसांगवी गावाजवळील दोन्ही पुलांचे पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले असून या पुलाची, तसेच नुकसानग्रस्त सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना श्री. बनसोडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच मरसांगवी गावाजवळ बॅरेज कम पूल उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असून यामुळे लोकांना रस्ता उपलब्ध होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. अतनूर ते गव्हाण रस्त्यावरील पुलाचेही पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झाले असून या पुलाचीही श्री. बनसोडे यांनी पाहणी केली. तसेच मरसांगवी, अतनूर येथील शेतीच्या नुकसानीचीही पाहणी केली.

घोणसी महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे झाल्याने झालेल्या नुकसानीची उपविभागीय अधिकारी श्री. शिंदे यांनी यावेळी माहिती दिली.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते नुकसानग्रस्तांना मदतीचे धनादेश वितरीत

रावणकोळा गावात अतिवृष्टीमुळे नऊ घरांमध्ये पाणी घुसून नुकसान झाले. या सर्व नुकसानग्रस्तांना क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते मदतीचे प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले. पुरामध्ये वाहून गेल्याने मृत्युमुखी पडलेल्या किशन रामा आडे यांच्या वारसांनाही लवकरात लवकर दिली जाईल, असे श्री. बनसोडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed