• Sat. Sep 21st, 2024

दिव्यांगांसाठी मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण

ByMH LIVE NEWS

Jul 27, 2023
दिव्यांगांसाठी मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण

मुंबई, दि २७ :-  राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्तालय,पुणे व जिल्हा परिषद सांगली यांच्या अंतर्गत कार्यरत असणारी शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगांसाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था आहे. या संस्थेला व संस्थेतील प्रशिक्षण वर्गांना महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाची मान्यता आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी या संस्थेत दिव्यांगांसाठी संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षणासाठी मोफत प्रवेश देणे सुरू आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्राचे अधीक्षक यांनी केले आहे.

या अभ्यासक्रमासाठी पात्रता व अटी पुढीलप्रमाणे :  

सर्टिफिकेट इन कम्प्युटर ऑपरेशन विथ एम एस ऑफिस यासाठी शैक्षणिक पात्रता किमान आठवी पास, मोटर अँड आर्मेचर वाइंडिंग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज इलेक्ट्रिक कोर्स यासाठी किमान नववी पास पात्रता आहे. यासाठीची वयोमर्यादा 16 ते 40 वर्षापर्यंत आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा असून फक्त दिव्यांगांनाच यात प्रवेश दिला जाणार आहे.

अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय आहे. अद्ययावत व परिपूर्ण संगणक कार्यशाळा, व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण, नेटवर्किंग व इंटरनेटची सुविधा, अनुभवी निदेशक तसेच समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना इत्यादी सोयी सवलती देण्यात येत आहे.

अर्ज कोठे व केव्हा करावा :

अभ्यासक्रमासाठी माहितीपत्रक अधीक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह टाकळी रोड म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ मिरज, जिल्हा सांगली या पत्त्यावर किंवा समक्ष मोफत मिळतील. अर्ज प्राप्त झाल्यावर तज्ञ समितीद्वारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे

शाळा सोडल्याचा दाखला, दहावीची गुणपत्रिका, अपंगत्व असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, युडीआयडी कार्ड, डोमिसाईल प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला यांच्या छायांकित प्रती जोडाव्यात.

००००००

मनीषा सावळे/वि.सं.अ./

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed