पुणे जिल्ह्यातील लोणावळा भागात पावसाचा सर्वात जास्त जोर आहे. विक्रमी पावसाची नोंद या भागात नोंदवली जात आहे. मात्र आता उशिरा ही दरड कोसळल्याने या मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ण पणे ठप झाली आहे. पोलिसांकडून दरड काढण्याचे काम सुरू असून पावसामुळे अनेक अडथळे निर्माण होत आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर साधारण दहा ते साडेदहाच्या सुमारास ही दरड कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळ तिनही लेनवरची वाहतूक ठप्प आहे. ओडोसी बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. पुण्यावरुन मुंबईला जाणाऱ्या तीन लेन यामुळे बंद आहेत. महामार्ग वाहतूक यंत्रणेच्या वतीने मार्गिका बदलण्याचं काम सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पुणे- मुंबई एक्सप्रेस वेवर आडोशी गावच्या हद्दीत (km. No.41/00 जवळ) मुंबई लाइनवर डोंगर भागातून दरड कोसळून मातीचा लगदा हा मुंबईच्या बाजूच्या तिन्ही लेनवर पडलेला आहे. त्यामुळे मुंबई लेनवरील वाहतूक थांबलेली आहे. हा मातीचा लगदा आयआरबीचे जेसीपी, डंपरच्या सहाय्याने काढून घेण्याचे काम चालू आहे. साधारणतः २० ते २५ डंपर डबर मार्गावर पडलेली आहे. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.
आयआरबीचे कर्मचारी, बोरघाट वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी व स्टाफ उपस्थित असून लगदा काढण्याचे काम चालू आहे.