• Sat. Sep 21st, 2024

पूरग्रस्त भागातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – पालकमंत्री गिरीष महाजन यांचे निर्देश

ByMH LIVE NEWS

Jul 23, 2023
पूरग्रस्त भागातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – पालकमंत्री गिरीष महाजन यांचे निर्देश

नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्ह्यातील बिलोली, देगलूर, मुखेड, धर्माबाद, माहूर या तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान खुप मोठे आहे. दोन व्यक्ती प्राणास मुकले आहेत. साधारणत: साठ जनावरे वाहून गेल्याचे समोर आले आहे. विशेषत: नदी नाल्याच्या जवळ असलेल्या अनेक भागातील शेतीची जमीन खरडून गेल्याने शेतकरी चिंतेत आहेत. जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी शासन निश्चितपणे मदतीसाठी पुढे येईल, असा विश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिला. सध्या अधिवेशन सुरू असून लवकरच याबाबत धोरणात्मक निर्णय सभागृहात जाहीर केल्या जाईल, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या परिस्थितीचा तपशीलवार आढावा घेऊन त्यांनी अतिवृष्टी झालेल्या बिलोली, देगलूर, मुखेड भागातील विविध गावांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार तुषार राठोड, आमदार भीमराव केराम, माजी आमदार सुभाष साबने, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, प्रवीण साले, डॉ. माधव पाटील उचेगांवकर, डॉ. विरभद्र हिमगीरे आदि पदाधिकारी उपस्थित होते. विमानतळ येथील बैठक कक्षात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पॉवर पॉईंट प्रेझेटेंशनद्वारे जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची माहिती दिली. पालकमंत्री गिरीष महाजन यांनी आढावा घेऊन प्रत्यक्ष गावांना भेटी दिल्या. यावेळी त्यांच्याहस्ते पूरग्रस्तांना प्रातिनिधीक स्वरुपात मदतीचे धनादेशही वाटप करण्यात आले.

अतिवृष्टीचा फटका राज्यातील अनेक जिल्ह्यांना बसला आहे. ग्रामीण भागातील लहान पूल व रस्त्याचीही मोठी दुर्दशा झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी दरवर्षी पूराच्या पाण्यामुळे रस्ते बंद झाल्याने संपर्क तुटतो. अशा गावांची व ठिकाणांची यादी करुन त्याठिकाणी नवीन पूलाच्या कामाबाबत प्राधान्याने विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याचबरोबर पूरामुळे बऱ्याच गावात शेतजमीन खरडून जाते. अशी गावे व शेतशिवाराच्या जागांची निवड करुन त्याठिकाणी मृदसंधारणाच्या दृष्टीने, पाणलोटाच्या दृष्टीने वेगळा विचार करुन मनरेगामार्फत जे काही करता येईल त्याबाबत शासन पातळीवर चर्चा करुन निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.

पालकमंत्री गिरीष महाजन यांनी बिलोली तालुक्यातील टाकळी, देगलूर तालुक्यातील लखा, वनाळी, सुगाव मुखेड तालुक्यातील एकलारा, टाकळी बु., बेटमोगरा, ऊच्चा माऊली या भागातील शिवाराची पाहणी केली. या भागातील अनेक ठिकाणी विद्युत खांब पडल्याने काही गावातील विद्युत प्रवाह खंडित झाला आहे. उपमुख्यमंत्री तथा राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी चर्चा केली असून ही कामे त्वरित पूर्ण करुन विद्युत पुरवठा पुर्ववत केला जाईल, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed