• Sun. Sep 22nd, 2024

शेगाव व लोणार विकास आराखड्यांचा विभागीय आयुक्तांकडून आढावा – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jul 21, 2023
शेगाव व लोणार विकास आराखड्यांचा विभागीय आयुक्तांकडून आढावा – महासंवाद

अमरावती, दि. 21 : शेगाव व लोणार विकास आराखड्यातील कामे कालमर्यादेत पूर्णत्वास जाणे अपेक्षित आहे. आराखड्यांतर्गत येणारी विविध विकासकामे कार्यान्वयन यंत्रणांनी समन्वयाने पूर्णत्वास न्यावीत. पूर्ण झालेल्या कामांचा प्रगती अहवाल वेळोवेळी सादर करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात शेगाव व लोणार विकास आराखड्यांतर्गत येणाऱ्या विविध विकासकामांचा आढावा विभागीय आयुक्तांनी बैठकांद्वारे आज घेतला. बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी, अर्थ व सांख्यिकी उपसंचालक सुशील आग्रेकर, आराखड्याचे विशेष कार्य अधिकारी हर्षद चौधरी, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, शेगाव, लोणार तालुक्याचे उपविभागीय अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी आदी दूरदुश्यप्रणालीच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित होते.

श्रीमती पाण्डेय म्हणाल्या की,  श्री संत गजानन महाराजांचे शेगाव व उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर ही दोन्ही स्थळे पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहेत. या पर्यटनस्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी आराखड्यातील सर्व नागरी सुविधांची व स्थापत्य बांधकामाची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार स्वरुपाची असावीत.

कार्यान्वयन यंत्रणांनी कामांची प्रगती व सद्य:स्थिती अहवाल वेळोवेळी समितीला सादर करावा. कामांची गुणवत्ता व दर्जा हा ‘थर्ड पार्टी’कडून तपासून उपयोगिता प्रमाणपत्र व कार्यपूर्ती अहवाल सादर करावा. शेगाव येथील हॉकर्स झोनचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी मंदिर प्रशासन व नगर परिषदेने समन्वयाने तोडगा काढावा, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले. आराखड्यांतर्गत असणाऱ्या विविध कामांचा आढावा त्यांनी घेतला.

लोणार विकास आराखड्याच्या कार्यान्वयन यंत्रणांत नगर परिषद, वनविभाग, एमटीडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व भारतीय पुरातत्व विभाग आदींचा समावेश आहे. लोणार सरोवर परिसरात पर्यटकांसाठी स्वच्छतागृहे, निवारा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची उर्वरित कामे गतीने पूर्ण करण्यात यावी. विद्यापीठाकडून उभारण्यात येणाऱ्या लोणार विज्ञान केंद्र व संशोधन प्रयोगशाळेचे काम वेळेत पूर्ण व्हावे जेणेकरून नवीनतम संशोधनाला चालना मिळेल. लोणार सरोवर परिसरातील ‘ईको टुरिझम’ चे काम पूर्णत्वास जाण्यासाठी वनविभागाने जबाबदारीपूर्वक प्रयत्न करावे, असेही त्यांनी सांगितले.

 शेगाव विकास आराखड्यात ४२९ कोटी ५६ लाख रू. निधीतून व लोणार विकास आराखड्यात ३६९ कोटी ७८ लाख रू. निधीतून कामांना चालना देण्यात आली आहे, अशी माहिती श्री. चौधरी यांनी सादरीकरणाद्वारे दिली. आराखड्यातील अपूर्णावस्थेतील कामे तत्काळ पूर्ण करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed