• Mon. Sep 23rd, 2024

राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर करून कायमस्वरुपी पुनर्वसनाचा निर्णय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत माहिती

ByMH LIVE NEWS

Jul 21, 2023
राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर करून कायमस्वरुपी पुनर्वसनाचा निर्णय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत माहिती

मुंबई, दि. २१ : राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी दुर्घटनेबाबत आज झालेल्या मंत्रिमडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यावेळी ज्या ठिकाणी धोका आहे अशा दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश देण्यात आले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

काल दिवसभर दुर्घटनास्थळी असलेले मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अनुभव कथन करताना त्या भागातील परिस्थिती किती बिकट आणि धोकायदायक होती याची माहिती दिली. इरशाळवाडी येथे दरड कोसळल्याने घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली. त्यामध्ये २० जणांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहेत. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत राज्य शासनाने जाहीर केली असल्याचे त्यांनी सांगितले. आज सकाळपासून इरशाळवाडी येथे शोधकार्यास सुरूवात झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणेमार्फत सर्व बचाव पथकांना तत्काळ पाचारण करण्यात आले. माहिती मिळताच मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री सर्वश्री गिरीष महाजन, दादाजी भुसे, उदय सामंत हे रात्रीच दुर्घटनास्थळाकडे रवाना झाले. मंत्री आदिती तटकरे, अनिल पाटील, आमदार महेश बालदी, प्रशांत ठाकुर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. यंत्रणांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी मी पायी चालत डोंगरावर जाण्याचा निर्णय घेतला. तेथील दृष्य विदारक होते, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

एवढ्या उंचावर साहित्य, साधनसामुग्री घेऊन जाणाऱ्या बचाव पथकातील कर्मचाऱ्यांना सलाम करतो, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनाग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीर असल्याची ग्वाही दिली. मात्र यंत्रणा, साधने असूनही प्रतिकुल परिस्थितीमुळे तिचा वापर करू शकलो नाही याची खंत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

बचाव कार्यास यशवंती हाइकर्स स्वयंसेवी संस्थेचे २५ स्वयंसेवक, ३० चौक ग्रामस्थ, वरोसे ग्रामस्थ २०, नगरपालिका खोपोली यांचेकडील २५ कर्मचारी, चौक ग्रा. पं. कडील १५ कर्मचारी, निसर्ग ग्रुप पनवेल यांचेकडील १५ स्वयंसेवक तसेच कोलाड रिव्हर राफटर्स इत्यादींचा सहभाग आहे. तसेच NDRF च्या ४ टिम एकूण १०० जवान TDRF चे ८० जवान स्थानिक बचाव पथकाच्या ०५ टीम यांनी बचाव कार्याच्या कामात मोलाची कामगिरी बजावित आहे.

इरशाळगडाच्या पायथ्याशी वैद्यकीय पथके, रुग्णवाहिकेसह आवश्यक अशा वैद्यकीय सुविधा व इतर साहित्य तत्काळ उपलब्ध करण्यात आले. बचाव करण्यात आलेल्या नागरिकांच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी आवश्यक सोयी-सुविधा युक्त कंटेनर्स व इतर मुलभूत सोयी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. शोध व बचाव कार्यासाठी आवश्यक साहित्य तातडीने बेस कॅम्प येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. दुर्घटनाग्रस्त नागरिकांच्या तात्पुरत्या निवास व्यवस्थेसाठी ६० कंटेनर मागविण्यात आले आहेत. सिडकोच्या माध्यमातून या नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

स्थानिक माहितीवरून सदरील आदिवासी वाडीमध्ये एकूण ४८ कुटुंब वास्तव्यास असून लोकसंख्या २२८ इतकी आहे. त्यातील सुमारे १७ ते १८ घरांवर दरड कोसळी आहे. बचाव कार्यात ९८ व्यक्तींना सुरक्षित वाचविण्यास यश आले आहे. २२८ पैकी उर्वरित १०९ व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. इरशाळवाडी हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) विभागाच्या अहवालानुसार संभाव्य दरडग्रस्त ठिकाणाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed