• Mon. Nov 25th, 2024

    इरशाळगडवाडी दुर्घटना : पशुधनाची काळजी घेण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सरसावला

    ByMH LIVE NEWS

    Jul 20, 2023
    इरशाळगडवाडी दुर्घटना : पशुधनाची काळजी घेण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सरसावला

    अलिबाग,दि.20(जिमाका) :- रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या इरशाळगडवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत मदत कार्यात पशुधनाची काळजी घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत.

    पथकामार्फत गुरुवारी 11 शेळ्या व 10 गोवर्गीय जनांवरावर उपचार करण्यात आले. तसेच या ठिकाणी एकूण 3 बैल व एक शेळी मृत आढळून आलेली असून, त्यांचे फोटो व पंचनामे करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ.शामराव कदम यांनी दिली आहे.

    पशुसंवर्धन विभागाच्या पथकाचे काम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

    इरशाळगडवाडी येथे बुधवारी रात्री अतिवृष्टीमुळे दरड कोसळली. या नैसर्गिक आपत्तीचे गांभीर्य लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी त्वरित उपाययोजनेचे नियोजन केले. सदर घटनास्थळी पशुधनाची काळजी घेण्यासाठी 1 सहाय्यक आयुक्त, 2 पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक व एक परिचर यांचे एक पथक यानुसार दोन पथके तयार करण्यात आली आहेत.

    या पथकांमार्फत जखमी पशुधनास उपचार करणे, मृत पशुधनाचे फोटो व पंचनामे करणे, शास्त्रोक्त पद्धतीने मृत जनावरांची विल्हेवाट लावणे व जखमी पशुधनास खाद्याचे नियोजन करणे इत्यादी कामे करण्यात आली.

    या पथकाद्वारे गुरुवारी पहाटे 5.30  वाजता प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली. दुर्घटनाग्रस्त ठिकाणी दिवसभरात 11 शेळ्या व 10 गोवर्गीय जनांवरावर उपचार करण्यात आले. तसेच या ठिकाणी एकूण 3 बैल व एक शेळी  मृत आढळून आलेली असून त्यांचे फोटो व पंचनामे करण्यात आलेले आहेत. जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या नियंत्रण कक्षात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व पशुधन विकास अधिकारी यांचा समावेश आहे. दुर्घटना ठिकाणी पशुधनासाठी साईबाबा मंदिर संस्थान पनवेल या संस्थेकडून खाद्य प्राप्त झाले असून, सदर खाद्य शुक्रवारी इरशाळगडवाडी येथे पोहोच करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed