• Mon. Nov 25th, 2024

    युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 14, 2023
    युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    पुणे, दि. १४: ‘करिअर कट्टा’ च्या माध्यमातून राज्यातील महाविद्यालयात अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून युवकांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

    सर परशुराम महाविद्यालयात आयोजित ‘करिअर कट्टा’  अंतर्गत करिअर संसद कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, शिक्षण प्रसारक नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, सेंटर ऑफ एक्सलन्स समिती करिअर कट्टाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, स.प. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुनील गायकवाड, चॉइस ग्रुपचे फिरोदिया गाडिया आदी उपस्थित होते.

    श्री. पाटील म्हणाले,  ‘करिअर कट्टा’च्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना राज्य पातळीवरील स्पर्धा परीक्षा, महाराष्ट्र व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा, उद्योजकता व्यक्तिमत्व विकास, व्यवस्थापकीय कौशल्य  व प्रत्यक्ष उद्योजकांचे मार्गदर्शन, वित्त व्यवस्थापन पोलीस भरती, बँकींग सेवा,  कमिशन अशा विविध अभ्यासक्रमाचे ३६५ रुपयांमध्ये मार्गदर्शन करण्यात येत असून त्यातून विद्यार्थ्यांना यश मिळत आहे, ही समाधानाची बाब आहे. विद्यार्थ्यांना फक्त मार्गदर्शन करुन चालणार नाही त्यांना  सर्वदृष्टीने

    पाठबळ मिळणे आवश्यक आहे. महाविद्यालयांनी औद्योगिक कंपन्याशी समन्वय करुन विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात कामाच्या ठिकाणचे ज्ञान मिळण्याच्यादृष्टिने प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांन यावेळी दिले.

    केंद्र शासनाने सन २०२० साली नवीन शैक्षणिक धोरणाची घोषणा केली असून आज त्याला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. नवीन शैक्षणिक धोरणात पारंपरिक कला, वाणिज्य या सारख्या शिक्षण पद्धतीत बदल करून कौशल्य विकास, मातृभाषेतून शिक्षण, नैतिक बहुमुखी शिक्षण आणि आपल्या परंपरेचा अभिमान असणाऱ्या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात येणार आहे. मातृभाषेतील शिक्षणामूळे विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान चांगल्याप्रकारे होऊन संशोधनाची वृत्ती वाढेल. अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम मराठीतून करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

    श्री. देवळाणकर म्हणाले,  स्पर्धा परीक्षेत मराठी टक्का वाढविण्याच्या दष्टिने ‘करिअर कट्टा’ चा उपक्रम अत्यंत महत्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आणि त्यांची संवेदनक्षमता वाढवणारा हा उपक्रम असून केंद्रीय लोकसेवेमध्ये मराठी प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. फक्त पुणे, मुंबई पुरताच हा उपक्रम न राहता राज्यातील ग्रामीण भागात हा उपक्रम राबविण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. विद्यार्थ्यांना कौशल्य युक्त बनविण्यासाठी करिअर   कट्टाने सहभाग घेतला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

    करिअर कट्टाच्या अभियानात विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय, बारामती यांनी १६२ विद्यार्थ्यांना व शिवाजी महाविद्यालय, श्रीगोंदा यांनी १४२ विद्यार्थ्यांना पोलीस भरती करुन चांगले कार्य केल्याने तसेच अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर, गोदावरी परुळेकर महाविद्यालय, तलासरी व शिव छत्रपती महाविद्यालय पाचोड यांनी करिअर कट्टा उपक्रमात चांगले योगदान दिल्याबद्दल पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

    यावेळी करिअर कट्टा माहिती पुस्तीकेचे प्रकाशन श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *